कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर बिनविरोध निवडून आलेल्या २० जागांव्यतिरिक्त १०२ जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण ४९० उमेदवार शिल्लक राहिले असून, २०५ उमेदवारांनी आपली उमेदवारी माघार घेतली आहे.
त्यात निवडणुकीपूर्वीच महायुतीचे २० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. अशामध्ये आता उर्वरित १०२ प्रभागातही आपले उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेना आणि भाजपचा प्रयत्न असणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे १४ आणि शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये वकील, डॉक्टर, व्यावसायिक, उपहारगृह चालक, ठेकेदार, कंत्राटदार, वाहतूकदार व्यावसायिक, कल्याण डोंबिवलीत खाडी किनारे, पालिकेची आरक्षणे हडप करून बेकायदा चाळी आणि इमारती उभारणारे भूमाफिया, काही उच्चशिक्षित यांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेत एकूण १२२ नगरसेवक आहेत. ३१ पॅनलमधून ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी नऊ निवडणूक अधिकारी कार्यरत आहेत. डोंबिवलीत एका उच्चशिक्षित वकील असलेल्या अभ्यासू माजी नगरसेवक आणि एक पक्षीय पदाधिकाऱ्याने अचानक युतीच्या उमेदवाराविरूद्ध माघार घेतल्याने कल्याण-डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी एक यांच्या कार्यालयातून १३, निवडणूक अधिकारी दोन यांच्या कार्यालयातून २३, निवडणूक अधिकारी तीन यांच्या कार्यालयातून १४, निवडणूक अधिकारी चार यांच्या कार्यालयातून १९, ५ विभागातून ३२, सहा विभागातून १७, सात विभागातून २२, ८ विभागातून २८, निवडणूक निर्णय अधिकारी ९ विभागातून ३७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अशी माहिती पालिका निवडणूक जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.