मराठी अभ्यास केंद्राचा काँग्रेसला इशारा
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तरभारतीयांसाठी प्रसिद्ध केलेला स्वतंत्र जाहीरनामा तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी लोक त्याची होळी करतील, असा इशारा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी दिला. मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेला मराठीनामा शुक्रवारी मराठी पत्रकारसंघात आयोजित पत्रकार परिषदेत सादर करण्यात आला. यावेळी आनंद भंडारे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुहास राणे तसेच संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले की, स्वतःच्या राज्यात बकालीकरण, बेकारी, असुरक्षितता आणि जातीयतेमुळे परप्रांतीय महाराष्ट्रात स्थलांतर करतात. येथील नैसर्गिक, राजकीय, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्रोतांचा वापर करूनही मराठी भाषा शिकण्यास नकार देतात. त्यातच काँग्रेससारखे पक्ष उत्तरभारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा काढतात, ही मुजोरी सहन केली जाणार नाही. परप्रांतीयांनी आपल्या राज्यात जाऊन आपली मुजोरी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठीनाम्याच्या पाठिंब्यासाठी ऑनलाइन मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठीनामा सर्व राजकीय पक्षांना देण्यात येणार असून, उत्तरभारतीय, गुजराती आणि मारवाडी समाजाचे लांगुलचालन करणारे मराठी नेते महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरत आहेत, असेही पवार यांनी सांगितले. “आज सुपात असलेले उद्या जात्यात जाणारच आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत परप्रांतीयांचा प्रवेश झाल्यास ते मराठी लोकांचा बंदोबस्त करतील,” असा इशारा त्यांनी दिला.
मराठी शाळा बंद पडण्यासाठी परप्रांतीय जबाबदार नसून मराठी असूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मुलांना शिकवणारे मराठी पालकच जबाबदार असल्याचे पवार यांनी नमूद केले.






