Saturday, January 3, 2026

कुठे युती, कुठे आघाडी ? महापालिका निवडणुकांसाठी कशी आहेत राजकीय समीकरणे ?

कुठे युती, कुठे आघाडी ? महापालिका निवडणुकांसाठी कशी आहेत राजकीय समीकरणे ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी तसेच निकाल आहे. या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवरील स्थितीनुसार राजकीय पक्षांनी कुठे युती तर कुठे आघाडी केली आहे. नेमकी कोणत्या महापालिकेत युती किंवा आघाडी आहे आणि कोणत्या महापालिकेत राजकीय पक्ष स्व बळावर लढत आहेत यावरुन मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. हाच संभ्रम दूर करणारी ही बातमी.

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांची युती आहे. या युती विरोधात मुंबईत उबाठा, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढत आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजप अशी युती आहे. ठाण्यातही उबाठा, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहेत. ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढत आहेत.

नवी मुंबई मनपात शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढत आहेत. तर उल्हासनगरमध्ये सगळे पक्ष स्वबळावर लढताना दिसत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप - शिवसेना युती आहे. उबाठा आणि मनसे हे दोन्ही पक्ष भाजप विरोधात एकवटले आहेत तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली आहे.

भिवंडीत भाजप आणि शिवसेनेने युती केली आहे. मिरा भाईंदरमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याचे चित्र आहे.

वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप - शिवसेना युती अशी लढत आहे. उबाठा स्वबळावर लढत आहे.

पनवेल महापालिकेत भाजप - शिवसेना युती आहे.

पुणे महापालिकेत भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठा, मनसे आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी केली आहे.

नाशिकमध्ये भाजप स्वबळावर तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढत आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे इथे एकत्र लढत आहेत.

मालेगावमध्ये सर्व पक्ष स्वबळावर लढत आहेत.

अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे. शिवसेना स्वबळावर लढत आहे. मविआ युती विरोधात निवडणूक रिंगणात उतरली आहे.

जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती आहे आणि इतर पक्ष स्वबळावर लढत आहेत.

धुळ्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे आणि भाजप स्वबळावर लढत आहे. महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आले आहेत.

अमरावतीत सर्व पक्ष स्वबळावर लढत आहेत.

अकोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. उबाठा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.

चंद्रपूरमध्ये उबाठा आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आणि शिवसेनेने युती केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी एक आघाडी आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा