Saturday, January 3, 2026

सूर्या कालव्यातून शेतीसाठी पाणी

सूर्या कालव्यातून शेतीसाठी पाणी

डहाणू-पालघरमधील शेतीला आधार

कासा : डहाणू आणि पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. सूर्या प्रकल्पाच्या डाव्या तीर कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी ३० डिसेंबरपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच, दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने उजव्या कालव्यातूनही येत्या दोन दिवसांत पाणी सोडले जाणार आहे.

पाटबंधारे विभागाने हाती घेतलेल्या कालव्यांच्या दुरुस्ती आणि अस्तरीकरणाच्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. डाव्या कालव्याच्या पहिल्या सात किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याने पाण्याच्या प्रवाहाला गती मिळाली आहे. यामुळे आता कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवणे शक्य झाले असून, शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली आहे.

कालव्यांची सद्यस्थिती :

डावा कालवा : एकूण लांबी २९ किमी असून, १ ते ७ किमीपर्यंतचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे.

उजवा कालवा : एकूण लांबी ३३ किमी आहे. येथेही पहिल्या ७ किमीचे काम पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यासाठी काम प्रस्तावित आहे. सध्या सुरू असलेल्या डागडुजीमुळे पाणी बंद असले तरी दोन दिवसांत ते पूर्ववत होईल.

शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणार पाणी

मुख्य कालव्यासोबतच लघु कालव्यांची दुरुस्ती आणि त्यातील गाळ काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. लघु कालवे स्वच्छ झाल्यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल आणि शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे पालघर आणि डहाणू पट्ट्यातील उन्हाळी पिकांना जीवदान मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment