१६ जानेवारीला मुंबईत महाविजय साजरा करणार!
'मुंबईचा महापौर हिंदूच आणि मराठीच होणार'
बुरखेवाली नाही, तर मराठीच महापौर; फडणवीसांचा 'वारिस पठाण'ला प्रत्युत्तर
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामासाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज वांद्रे येथे फोडण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथीचे महत्त्व अधोरेखित करत विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, "आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे, कारण आज तिथीनुसार माँसाहेब जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. हा एक शुभ संकेत आहे. १४ आणि १५ तारीख ही संक्रमणाची असून, या काळात आपल्याला मुंबईत परिवर्तनाचा चमत्कार घडवायचा आहे."
पुढे बोलताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. ते म्हणाले, "येणारी १६ तारीख ही धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. या पवित्र दिवशी मुंबईच्या महापालिकेत महायुतीचाच महापौर बसवून आपण विजयाचा इतिहास घडवू." या आवाहनाद्वारे फडणवीस यांनी मुंबईतील आगामी सत्तांतराचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे कोणाच्याही बापाला शक्य नाही!
"निवडणूक जवळ आली की विरोधकांचा एकच 'भोंगा' सुरू होतो, तो म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. पण मी ठणकावून सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे कोणाच्या बापाच्या बापाच्या बापालाही शक्य नाही," अशा कडक शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. मुंबईच्या अस्मितेवरून राजकारण करणाऱ्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, "आमच्यासोबत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे उभा आहे. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेबाबत कोणीही चिंता करण्याची गरज नाही." वारसाहक्काच्या राजकारणावर भाष्य करताना फडणवीस पुढे म्हणाले की, "जन्माने केवळ रक्ताचा वारसा मिळत असतो, पण विचारांचा खरा वारसा हा आपल्या कर्माने आणि कर्तृत्वाने मिळवावा लागतो. तो बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा आज आमच्याकडे आहे, तो एकनाथ शिंदेंकडे आहे." या विधानातून त्यांनी उबाठावर निशाणा साधत महायुतीच बाळासाहेबांच्या विचारांची खरी उत्तराधिकारी असल्याचे स्पष्ट केले.
बुरखेवाली महापौर होणार म्हटल्यावर भोंगे बंद
"मुंबईत सध्या श्रेय लाटणारी एक टोळी सक्रिय झाली आहे, ज्यामध्ये काही 'अबोल बालकांचा' समावेश आहे. मेट्रो आणि कोस्टल रोडचे काम आम्हीच केले, असा दावा ही मंडळी करत आहेत. परंतु, कोणत्याही मुंबईकराला मध्यरात्री झोपेतून उठवून विचारले तरी तो सांगेल की, मुंबईचा कायापालट करणारी ही सर्व कामे केवळ महायुतीनेच केली आहेत," अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या दाव्यांमधील हवा काढून घेतली. दोन भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे काय होणार, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपल्या खास शैलीत, “देख कर धुंधली सी ताकद, हौसला हमारा कम नहीं होता, झुठीं ऑधीयोंसे वही डरे, जीन चिरागोंमें दम नही होता”, अशी शायरी सादर करत विरोधकांना आव्हान दिले. मुंबईच्या आगामी महापौराबाबत भाष्य करताना फडणवीस ठामपणे म्हणाले की, "वारीस पठाण जेव्हा 'बुरखेवाली महापौर' होईल असे म्हणतात, तेव्हा विरोधकांच्या बॅटरीमधील सेल अचानक डाऊन होतात आणि त्यांचे भोंगे बंद पडतात. पण मी पुन्हा सांगतो, मुंबईचा महापौर हा हिंदूच असेल, मराठीच असेल आणि तो केवळ महायुतीचाच असेल."
यापुढे मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही
मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "कंत्राटदार आणि बिल्डरांच्या अंतर्गत भांडणामुळे यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी बीडीडी चाळींचा सत्यानाश केला होता. मात्र, आम्ही बिल्डरांना बाजूला सारून म्हाडाच्या माध्यमातून स्वतः घरे बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे ८० हजार मराठी माणसांना त्याच ठिकाणी घर मिळाले, अन्यथा त्यांना वसई-विरारला स्थलांतरित व्हावे लागले असते." मुंबईतील मराठी माणूस कोणत्याही परिस्थितीत मुंबईबाहेर जाणार नाही आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल, असा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. मुंबईच्या दळणवळणाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, "मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी आम्ही ४५० किमीचे मेट्रो जाळे विणले असून १५० किमीचे काम पूर्ण झाले आहे. २०२७ पर्यंत सर्व मार्ग पूर्ण होतील आणि अवघ्या ५९ मिनिटांत मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचता येईल." यासोबतच मुंबईसाठी १७ हजार कोटींचे 'पर्यावरणीय बजेट' जाहीर करत देशाला दिशा देणारे पर्यावरणपूरक शहर घडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर गरिबांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी महायुतीला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन करत १५ तारखेचा मोठा विजय आणि १६ तारखेचा 'महाविजय' हा माझा शब्द आहे, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
"घुसखोरांना शोधून बाहेर काढणार आणि गिरणी कामगारांना मुंबईतच घर देणार"
"मुंबईच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या सात-आठ महिन्यांत अनेक बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्यात आले आहे. येणाऱ्या काळात ममता दीदींच्या आशीर्वादाने मुंबईत शिरलेल्या एका-एका घुसखोराला शोधून काढून पुन्हा पाठवू," अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. सुरक्षित मुंबई आणि सामान्य मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण करणे हेच महायुतीचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेतील ७० हजार कोटींच्या मुदत ठेवींवर (FD) टीका करताना फडणवीस म्हणाले की, "विरोधक ७० हजार कोटींच्या ठेवींच्या गप्पा मारतात, पण त्या पावत्यांचे मुंबईकरांनी काय करायचे? ज्यावेळी गिरणी कामगार हतबल होऊन मुंबईबाहेर जात होता, तेव्हा याच ७० हजार कोटींतून २-३ हजार कोटी खर्च केले असते, तर माझ्या कष्टकरी गिरणी कामगाराला याच मुंबईत हक्काचे घर मिळाले असते." कंत्राटदार आणि बिल्डरांच्या हितसंबंधांमुळे रखडलेल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास आम्ही म्हाडाच्या माध्यमातून करून ८० हजार मराठी कुटुंबांना हद्दपार होण्यापासून वाचवले आहे. यापुढेही मुंबईतील मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. तसेच ४५० किमीच्या मेट्रो जाळ्यामुळे २०२७ पर्यंत संपूर्ण मुंबईकरांचा प्रवास केवळ ५९ मिनिटांत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






