Sunday, January 4, 2026

क्रांतीज्योतीचे योगदान स्त्री शक्तीला वरदान

क्रांतीज्योतीचे योगदान स्त्री शक्तीला वरदान

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांचे पोटी ३ जानेवारी १८३१ रोजी एक रत्न जन्माला आले. त्या सावित्रीबाई फुले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तेरा वर्षांच्या महात्मा जोतिराव फुले यांच्याशी त्यांचा शुभविवाह झाला. इंग्रजी राजवट, यवनी काळ पडदा पद्धत अशा स्थितीत महिलांना शिकवणार कोण? हा प्रश्न महात्माजींना पडला आणि त्यांनी प्रथम स्वतःच्या पत्नीस म्हणजे सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका झाल्या.

सावित्रीबाई जोतिराव फुले या एक थोर भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ, कवयित्री होत्याच. त्यासह आपल्या पतीसमवेत महिलांचे अधिकार, हक्क, जाणीव जागृती, शिक्षण, संरक्षण आणि परिवर्तन, प्रबोधन आणि समाजसुधारणा यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले. म्हणूनच त्यांना स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखले जाते.पुण्यातील भिडे वाड्यात या दाम्पत्यांनी १८४८ रोजी पहिली मुलींची शाळा स्थापन केली. साहित्यिका, लेखिका, कवयित्री असल्याने विपुल लेखनही केले.

करमट सनातनी लोकांनी त्यांचे जगणे असह्य केले होते. शेन चिखल दगडाचा मारा सहन करणारी सावित्रीबाई स्त्री जातीला लाभलेलं अनोखे वरदानच! विधवा स्त्रीला विद्रूप करणारे केशवपण असो, त्यासाठी नाभीकांचा संप पुकारणे, बैठक घेणे. त्याबरोबरच समाजात परिवर्तन, जागृती व सुधारणा घडवून आणणे. स्त्री ही माणूसच आहे. तिच्या वेदना समजून घेणे आणि शिक्षणाविषयी तिला सबल, सक्षम करणे इत्यादी मोलाचे कार्य त्यांनी केले. १८९७ मध्ये प्लेगची साथ आली. त्या काळात आपल्या डॉ. यशवंत या दत्तक पुत्रासह रुग्णांना सेवा सुश्रुषा वैद्यकीय उपचार स्थलांतर अन्नाच्या छावण्या उपलब्ध केल्या. यासाठी रात्रंदिन जीवाचे रान केले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. अशातच त्यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी या क्रांतीज्योतीची ज्योत अनंतात विलीन झाली; परंतु आज एका सावित्रीने लाखो सावित्रीच्या लेकींना, व्यक्तिमत्त्वांना, अस्तित्वाला अस्मितेला जन्म दिला. शिक्षण, विचार, हक्काचे स्वातंत्र्य दिले. आजही त्या देदीप्यमान कार्याने प्रज्वलित क्रांतीज्योती आहेत.

सावित्री माई तू नसतीस तर... सावित्री माई तू नसतीस, तर हाती असती फुंकणी आली नसती लेखणी सावित्री माई तू नसतीस, तर डोईवर असता हंडा बंद झाला नसता हुंडा. सावित्री माई तू नसतीस, तर हाती नसता माईक आमी तुझेच पाईक. सावित्रीबाई तू नसतीस, तर जगणे आमचे हीनदिन तुझमुळे आला आज सोनियाचा दिन. सावित्रीबाई तू नसतीस, तर कसे असतो कर्तुत्वास सिद्ध तुझं मुळे आली मनी जिद्द सावित्री तू नसतीस, तर मुकलो असतो हक्कास, आज जीवन झाले झकास सावित्रीबाई तू नसतीस, तर कशी झाली असती प्रगती तूच दिलीस चहूमुलखी कीर्ती. क्रांतीज्योतीच्या थोर कार्याला त्रिवार अभिवादन.

Comments
Add Comment