मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका निर्णयामुळे देशभरातून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात असून, काही संघटनांकडून तीव्र आंदोलन आणि आक्षेपार्ह वक्तव्येही केली जात आहेत. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानविरोधात संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे.
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांमुळे देशात आधीच तीव्र भावना आहेत. अशा परिस्थितीत शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघासाठी बांगलादेशी क्रिकेटपटूची निवड केल्याचा आरोप केला जात असून, त्याच निर्णयामुळे हा वाद अधिक चिघळला आहे. काही जणांनी शाहरुख खानवर देशविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत त्याला गद्दार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
मेरठच्या दौराळा भागात आयोजित अटल स्मृती संमेलनात बोलताना भाजप नेते संगीत सोम यांनी शाहरुख खानवर गंभीर आरोप केले. आयपीएलमध्ये बांगलादेशी क्रिकेटपटूला कोट्यवधी रुपयांना खरेदी करणं हे देशविरोधी कृत्य असल्याचं त्यांनी म्हटलं. अशा लोकांना देशात राहण्याचा अधिकार नसल्याचा दावाही त्यांनी केला. बॉलिवूड आणि क्रिकेटच्या माध्यमातून देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, अखिल भारतीय हिंदू महासभेनेही शाहरुख खानच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. शाहरुख खानने आपल्या आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडूचा समावेश केल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. या निषेधादरम्यान काही ठिकाणी अत्यंत आक्षेपार्ह आणि टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
आग्रा येथील हिंदू महासभेच्या जिल्हाध्यक्ष मीरा राठोड यांनी केलेलं वक्तव्य विशेष चर्चेत आलं आहे. त्यांनी शाहरुख खानवर गंभीर आरोप करत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
याच प्रकरणात दिनेश फलाहारी महाराज यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून शाहरुख खानवर आरोप केले आहेत. शाहरुख खानला बांगलादेशातील परिस्थितीची माहिती असूनही त्याने बांगलादेशी खेळाडूला मोठ्या रकमेवर विकत घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, शाहरुख खानचे बांगलादेशातील काही कट्टर घटकांशी संबंध असू शकतात, असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. या आरोपांमुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर होत चाललं आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर शाहरुख खान किंवा त्याच्या व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या वादामुळे सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू असून, समर्थन आणि विरोध अशा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत.






