Friday, January 2, 2026

निर्मितीवस्था आणि पंचनायिका...!

निर्मितीवस्था आणि पंचनायिका...!
राज चिंचणकर, राजरंग

रंगभूमीवर नाटक सादर होत असताना, रंगमंचाच्या मागे दुसरे नाट्य घडत असते आणि त्या नाट्याचा दृश्य परिणाम रंगभूमीवरून रसिकांसमोर येत असतो. मात्र मुळात जेव्हा नाटक निर्मितीवस्थेत असते; तेव्हा सुद्धा त्यामागे एक वेगळेच नाट्य रंगलेले असते. अर्थात प्रत्येक वेळी असे काही होईल असे नाही; परंतु काही नाटकांच्या बाबतीत मात्र असे घडते खरे...! आता उदाहरणच द्यायचे तर याच आठवड्यात रंगभूमीवर आलेल्या 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकाचे देता येईल. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' हे नाटक पहिल्यांदा १९७२ या वर्षी रंगभूमीवर आले आणि प्रा. मधुकर तोरडमल यांनी ते प्रचंड गाजवले. त्यांच्या नंतरही काही संस्थांनी हे नाटक रंगभूमीवर आणले होते आणि आता हे नाटक नव्या संचात आणि नव्या ढंगात, नव्याने रंगभूमीवर आले आहे. या नाटकाच्या निर्मितीच्या मागची कथा म्हणजे सुद्धा एक नाट्यच आहे आणि त्याद्वारे, या नाटकाशी संबंधित पंचनायिकांनी केलेला एक पण पूर्णत्वास गेल्याची घटना या नाटकाच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

नाट्यसृष्टीत गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले आणि विविध प्रकारची नाटके रंगभूमीवर आणणारे नाट्यनिर्माते म्हणजे दिनू पेडणेकर...! मध्यंतरी एका निर्मात्याने, एखादे चांगले चालू शकेल असे नाटक सुचवण्याची विनंती दिनू पेडणेकर यांना केली. त्याप्रमाणे, दिनू पेडणेकर यांनी त्याला 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' हे नाटक सुचवले. ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक व सूत्रधार अशोक मुळ्ये यांच्याद्वारे प्रा. मधुकर तोरडमल यांच्या कुटुंबियांकडून नाटक करण्यास संमतीही मिळाली. त्यामुळे या नाटकाची निर्मिती करण्यास काहीच अडचण नव्हती. साहजिकच, हे नाटक नव्या संचात सादर करण्यासाठी जुळवाजुळव सुरू झाली आणि नाटकाच्या तयारीला वेग आला. नाटकाच्या मुहूर्ताचा दिवसही ठरला. सर्वकाही सुविहितपणे सुरू असताना मुहूर्ताच्या अगदी दोन दिवस आधी संबंधित निर्मात्याने काही कारणास्तव नाटकातून थेट काढता पाय घेतला. या घटनेमुळे सदर नाटकमंडळींना धक्काच बसला. आता नाटक रंगभूमीवर येणार कसे; असा प्रश्न सर्वांच्याच चेहऱ्यावर होता. हे सर्व होईपर्यंत, राजेश देशपांडे यांच्या हाती या नाटकाची दिग्दर्शकीय सूत्रे देण्यात आली होती. अतुल तोडणकर, अभिजीत चव्हाण, नीता पेंडसे यांची प्रमुख कलावंत म्हणून निवडही झाली होती. पण अचानक हे अनपेक्षित संकट समोर उभे ठाकल्यामुळे सगळा गोंधळ उडाला. आता नाटकाचा मुहूर्त सुद्धा ठरला असताना, नाटक बंद कसे काय करायचे; असा प्रश्न या नाटकाचे सूत्रधार दिनू पेडणेकर यांना पडला. पण अशा या आणीबाणीच्या प्रसंगी दिनू पेडणेकर यांची पत्नी प्रियांका पेडणेकर त्यांच्या मागे ठाम उभ्या राहिल्या. त्यांनी त्यांच्या परिवारात या एकूणच स्थितीची चर्चा केली; तेव्हा त्यांच्या कुटुंबातल्या अजून चारजणी या नाटकाच्या निर्मितीसाठी धावून आल्या.

प्रियांका पेडणेकर यांच्यासह त्यांच्या भगिनी मधुरा पेडणेकर व योगिता गोवेकर; तसेच प्रियांका व दिनू पेडणेकर यांची कन्या विजया राणे व भाची प्राची पारकर, अशा पाचजणींनी या नाटकाच्या निर्मितीची धुरा हाती घेतली. या पंचनायिकांच्या रूपाने या नाट्यनिर्मितीचा पाया भक्कम बनला. दिनू पेडणेकर यांच्यासाठी हा मोठाच दिलासा ठरला. शेवटी या पाचजणींनी घेतलेल्या ठाम निर्णयानंतर आता हे नाटक रंगभूमीवर आले आहे. या नाटकाचा मोठ्या धडाक्यात शुभारंभ झाला असून, सध्या हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. स्त्रीशक्ती एकत्र आल्यावर काय घडू शकते, याचे ठळक उदाहरण मराठी नाट्यसृष्टीत या नाटकाच्या निमित्ताने आता कायम झाले आहे. सप्त एकांकिकांची बोली... एकांकिकांच्या क्षेत्रात विशेष स्थान मिळवलेल्या 'सुप्रिया प्रॉडक्शन'च्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत आता सप्त एकांकिकांची बोली लागणार आहे. या संस्थेने आयोजित केलेल्या यंदाच्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. या सप्त एकांकिकांची अंतिम फेरी २९ जानेवारी रोजी माहीम-माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष आहे. विविध बोलीभाषांचे आविष्कार यावेळी रंगणार आहेत.

'सपान' (माणदेशी), 'डिझाईन' (घाटी), 'पाकळ्या' (खान्देशी), 'फ्रीडम अट मिडनाईट' (मालवणी), 'त्यात काय!' (घाटी), 'सत्य' (मालवणी), 'पाकिस्तानचं यान (घाटी) या एकांकिकांमध्ये आता अंतिम फेरीत विजेतेपदासाठी चुरस आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांतून पंकज गुप्ता, दर्शन पाटील, प्रियांका जाधव, विनायक आभाळे, देवेंद्र देव आणि डॉ. मेघा गावडे यांना अभिनयाची पारितोषिके जाहीर झाली आहेत. रंगकर्मी मंगेश सातपुते व संदीप रेडकर यांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, नाशिक, सिंधुदुर्ग अशा विविध ठिकाणांहून आलेल्या नाट्यसंस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा