अलिबाग : रायगड जिल्हा ताज्या मासळीबरोबरच सुक्या मासळीसाठीही प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यात ठिकाठिकाणी सुक्या मासळीच्या बाजारपेठा नजरेत पडतात. या बाजारपेठांमध्ये लाखोंची उलाढाल होत असून, सध्या रायगड जिल्ह्यात सुक्या मासळीची आवक वाढल्याने सुक्या मासळीचे दरही आटोक्यात आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांकडून मोठ्याप्रमाणात सुक्या मासळीची खरेदी होत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई, कोकण आणि किनारपट्टीच्या भागात सुकी मासळी खूप लोकप्रिय आहे. दरदिवशी समुद्रात मिळालेली ताजी मासळी ही सगळीच विकली जात नाही. त्यामुळे ही मासळी सुकवून नंतर विकली जाते.
सध्या ओली मासळी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने अलिबाग, मुरड, उरण, श्रीवर्धन, नावगाव, वरसोली याठिकाणी मासळी सुकवली जाते. सध्या मासळी सुकविण्यासाठी, तर सायंकाळी सुकविलेली मासळी जमा करण्यासाठी कोळी महिलांची लगबग सुरु असते.
रायगड जिल्ह्यात ४ हजार ९९३ छोट्या-मोठ्या नौकांच्या माध्यमातून मासेमारी करण्यात येते. बाजारात ताजे मासे मुबलक आल्याने माशांना फारशी किंमत मिळत नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेले ताजे मासे फेकून फुकट घालविण्यापेक्षा हे मासे सुकविले जातात. बोंबिल, अंबाड, जवळा, कोळंबी, ढोमी आदी छोट्या मासे देखील सुकविले जातात.
प्रमुख बाजारपेठा : अलिबाग, श्रीवर्धन, उरण, नावगाव.
प्रमुख मासळी : बोंबिल, कोळंबी, जवळा, बांगडा.
परिस्थिती : आवक वाढल्याने दर आटोक्यात, पर्यटकांची पसंती.






