मध्य व पश्चिम रेल्वेवरील सेवांमध्ये बदल
मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तसेच पश्चिम रेल्वेवर येत्या ३, ४ जानेवारी रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही उपनगरीय लोकल सेवांमध्ये बदल, वळण मार्ग, तर काही गाड्या रद्द राहणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गांवर रविवारी (४ जानेवारी) रोजी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या कालावधीत मेगा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १०.१४ ते १५.३२ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंडवरून पुन्हा धीम्या मार्गावर वळवून नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. तसेच ठाणे येथून ११.०७ ते १५.५१ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड स्थानकावरून अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला व शीव स्थानकांवर थांबतील व माटुंग्यानंतर पुन्हा अप धीम्या मार्गावर धावतील. या सेवाही अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर १३ तासांचा मेजर ब्लॉक
दरम्यान, पश्चिम रेल्वेवर ग्रांट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ब्रिज क्रमांक ५ च्या री-गर्डरिंग कामासाठी शनिवार-रविवार, ३/४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ ते दुपारी १२ या कालावधीत अप व डाउन धीम्या मार्गांवर १३ तासांचा मेजर ब्लॉक राहणार आहे. यावेळी मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या अप जलद मार्गावर, तर चर्चगेट ते माहिमदरम्यान डाउन धीम्या मार्गावरील गाड्या डाउन जलद मार्गावर चालवण्यात येतील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने महालक्ष्मी, प्रभादेवी व माटुंगा रोड स्थानकांवर या गाड्या थांबणार नाहीत. तसेच प्लॅटफॉर्म लांबी अपुरी असल्याने लोअर परळ व माहिम स्थानकांवरही काही सेवांना थांबा नसेल. काही उपनगरीय गाड्या रद्द राहणार असून काही चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या बांद्रा किंवा दादर येथेच शॉर्ट टर्मिनेट किंवा रिव्हर्स केल्या जाणार आहेत.
याशिवाय प्रभादेवी येथील आरओबी हटविण्याच्या कामासाठी डाउन धीम्या मार्गावर रात्री ११.३० ते सकाळी ७ या वेळेत सुमारे ७.३० तासांचा अतिरिक्त मेजर ब्लॉक राहील. या काळात प्रवाशांना दादर/बांद्रा येथून विरुद्ध दिशेने (ऑपोजिट डायरेक्शन) प्रवास करण्याची विशेष परवानगी देण्यात आली आहे.
हे सर्व ब्लॉक रेल्वे पायाभूत सुविधा सुरक्षित व सक्षम ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले असून, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
ट्रान्स-हार्बर मार्गावर सेवा बंद
ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान अप व डाउन दोन्ही मार्गांवरील सेवा रविवारी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या कालावधीत पूर्णतः बंद राहतील. या ब्लॉकमुळे ठाणे येथून १०.३५ ते १६.०७ या वेळेत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन सेवा तसेच पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप सेवा १०.२५ ते १६.०९ या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत.






