Sunday, January 4, 2026

Tamilnadu Shocker : भयंकर! घराला बाहेरून कडी लावून जोडप्याला जिवंत जाळले अन्... तिरुवनंतपुरममधील धक्कादायक घटना

Tamilnadu Shocker : भयंकर! घराला बाहेरून कडी लावून जोडप्याला जिवंत जाळले अन्... तिरुवनंतपुरममधील धक्कादायक घटना

तिरुवनंतपुरम : तामिळनाडूतील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातून एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. चेंगगम जवळील पाकिरिपालयम गावात अज्ञात व्यक्तींनी एका झोपडीला बाहेरून कुलूप लावून आग लावून दिली. या भीषण आगीत ५३ वर्षीय शेतकरी आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा जागीच जळून कोळसा झाला आहे.

नेमकी घटना काय?

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पी. शक्तिवेल (वय ५३) आणि एस. अमृतम (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. शक्तिवेल हा शेतकरी असून तो गेल्या तीन वर्षांपासून अमृतमसोबत एका शेतात बांधलेल्या लहान झोपडीत राहत होता. पहाटेच्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांना जळण्याचा उग्र वास आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले, मात्र तोपर्यंत झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली होती.

पाचवीला पुजलेले कौटुंबिक वाद

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शक्तिवेल हा आपल्या पत्नीपासून तीन वर्षांपूर्वी विभक्त झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले सध्या बंगळुरूमध्ये राहतात. दुसरीकडे, अमृतम ही देखील आपल्या पतीपासून विभक्त झाली होती आणि तिलाही तीन मुले आहेत. हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून 'लिव्ह-इन' मध्ये राहत होते. गुरुवारी रात्री शक्तिवेलची मुलगी त्याला भेटायला आली होती आणि जेवण करून रात्री ९ वाजता निघून गेली होती. त्यानंतर मध्यरात्री ही घटना घडली.

पोलिसांचा तपास आणि संशय

चेंगगम पोलीस निरीक्षक एम. सेल्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा घातपाताचा प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. झोपडीला बाहेरून कडी लावण्यात आली होती, जेणेकरून कोणालाही बाहेर पडता येऊ नये. फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी दोन्ही मृतांच्या माजी पती-पत्नीच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment