Wednesday, January 28, 2026

KBC १७ सीझनचा प्रवास संपला ,अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांत पाणी

KBC १७ सीझनचा प्रवास संपला ,अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांत पाणी

मुंबई: २००० साली सुरू झालेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो आजही तितकाच लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांत या कार्यक्रमाने अनेक विक्रम नोंदवले असून, आता शोचा १७ वा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या सीझनच्या शेवटच्या भागात कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

टीव्ही विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय शोपैकी एक असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ व्या सीझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या सीझनला निरोप देताना बिग बींनी प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं आणि स्टुडिओतील वातावरणही भावनिक झालं.

शोच्या शेवटच्या भागात प्रेक्षकांशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, काही क्षण इतक्या वेगाने निघून जातात की ते कधी सुरू झाले आणि कधी संपायला आले, हे कळतच नाही. माझ्या आयुष्याचा एक तृतीयांशपेक्षा अधिक काळ मी या मंचावर तुमच्यासोबत घालवला आहे आणि यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

ते पुढे म्हणाले, मी जेव्हा हसलो तेव्हा तुम्हीही माझ्यासोबत हसलात. जेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू आले, तेव्हा तुमच्याही डोळ्यांत पाणी होतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही माझ्या या प्रवासाचे साक्षीदार आहात. तुम्ही आहात म्हणून हा खेळ आहे आणि हा खेळ आहे म्हणून आम्ही आहोत.

निरोपाच्या या क्षणी वातावरण काहीसे गंभीर झालं होतं, मात्र अमिताभ बच्चन यांनी आपल्या खास शैलीत प्रेक्षकांचा उत्साह कायम ठेवला. या भागात गेल्या १७ सीझनमधील खास क्षणांचा एक विशेष व्हिडीओही दाखवण्यात आला. हा आठवणींचा प्रवास पाहून बिग बींसह स्पर्धक आणि प्रेक्षकही भावूक झाल्याचं दिसून आलं.

Comments
Add Comment