Saturday, January 3, 2026

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेला शहरात पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेला शहरात पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक: पाण्यासंदर्भात नाशिककरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवस नाशिककरांनी पाण्याचा जपून वापर करायचा आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपूर विभागातील मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. नाशिकच्या मुक्त विद्यापीठ गेटजवळ १२०० मिमी व्यासाची पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे शहराला पाणी कपातीचा फटका बसणार आहे. ही गळती गळती रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने रविवार, ४ जानेवारी रोजी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

नाशिक शहरात पाइपलाइन फुटल्याने महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम ४ जानेवारीला दिवसभर सुरू राहणार असल्याने दिवसभर शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाइपलाइन दुरुस्तीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ज्यासाठी किमान ८ ते १० तास लागण्याची शक्यता आहे. या कामाचा फटका जास्त प्रमाणात सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पंचवटी आणि सिडको या पाचही मुख्य विभागांना बसणार आहे. तर रविवारी दिवसभर दुरुस्तीचे काम चालणार असल्याने सोमवार, ५ जानेवारी रोजी सुद्धा सकाळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे.

"जलवाहिनीची गळती मोठी असल्याने तातडीने काम करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी साठा जपून वापरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे. रविवारी दुपारचा आणि संध्याकाळचा पुरवठा पूर्णपणे बंद असेल, तरी नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवणे हिताचे ठरेल", असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने केले आहे. तर सोमवारी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा