डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी आंदोलकांविरोधात बळाचा वापर करण्याच्या मुद्द्यावर इराणला गंभीर इशारा दिला आहे. जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या केली, तर अमेरिका इराणविरोधात कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट करत इराणला इशारा दिला आहे. जर इराणने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केला व त्यांची क्रूरपणे हत्या केली, जी की त्यांची प्रथाच आहे, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांच्या मदतीसाठी धावून येईल. आम्ही पूर्णपणे सज्ज आणि तयार आहोत. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद! – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प,” अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे. इराणमध्ये मागील काही दिवसांपासून खोमेनी सरकारविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. आता यामध्ये अमेरिका उडी घेण्याच्या तयारीत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी मोहीम राबवणाऱ्या या निदर्शकांना अमेरिकेचा काही प्रमाणात पाठिंबा असल्याचे मानले जाते.
इराणमध्ये सत्ता बदलाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या निदर्शनांचा शुक्रवारी सहावा दिवस होता. आर्थिक निदर्शनांनी आता राजकीय वळण घेतले आहे, निदर्शकांनी ‘हुकूमशहाला मृत्युदंड’ व ‘मुल्लांनो, देश सोडून जा’, अशा घोषणा दिल्या आहेत. इराणमध्ये पोलीस कारवाई व निदर्शकांविरुद्ध गोळीबारात काही निदर्शकांचे मृत्यू झाले आहेत. इराणमधील परिस्थिती वेगाने बदलत आहे. इंटरनेटवर निर्बंध लादण्यात आले आहेत.






