Saturday, January 3, 2026

Hardik Pandya Century : पांड्या इज बॅक! ६ चेंडूत ३४ धावा अन् करिअरमधील पहिलं वादळी शतक; पाहा धडाकेबाज शतकाचा Video

Hardik Pandya Century : पांड्या इज बॅक! ६ चेंडूत ३४ धावा अन् करिअरमधील पहिलं वादळी शतक; पाहा धडाकेबाज शतकाचा Video

राजकोट : भारतीय क्रिकेट संघ आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी सज्ज होत आहे. या मालिकेसाठी संघ निवड होण्यापूर्वीच भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या बॅटने मैदानात आग लावली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) बडोद्याचे प्रतिनिधित्व करताना हार्दिकने विदर्भा विरुद्ध तुफानी शतक झळकावून आपण फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. राजकोटमधील खांदेरी येथील निरंजन शाह स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याने सुरुवातीपासूनच विदर्भाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत केवळ शतकच पूर्ण केले नाही, तर स्टेडियममधील उपस्थित क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले. या खेळीमुळे हार्दिकची आगामी न्यूझीलंड दौऱ्यातील जागा आता जवळपास निश्चित मानली जात आहे.

एकाच षटकात कुटल्या ३४ धावा; ६८ चेंडूत ठोकलं वादळी शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याने मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळताना हार्दिकने अशा काही पद्धतीने शतक पूर्ण केले की, अख्खे स्टेडियम अवाक झाले. अवघ्या एका षटकात ३४ धावा कुटत त्याने ६८ चेंडूंमध्ये आपली शतकी खेळी साकारली. डावाच्या सुरुवातीला हार्दिक अत्यंत संयमाने खेळत होता. त्याने ४४ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. ३८ व्या षटकापर्यंत तो ६६ धावांवर खेळत होता. मात्र, ३९ व्या षटकात त्याने आपला 'कॅरिबियन' अंदाज दाखवला. त्या एका षटकात हार्दिकने सलग ५ षटकार आणि १ चौकार लगावत तब्बल ३४ धावा वसूल केल्या आणि काही क्षणातच शतकाचा टप्पा ओलांडला. हार्दिकने या डावात केवळ ६८ चेंडू खेळले, ज्यात त्याने ८ उत्तुंग षटकार आणि ६ नेत्रदीपक चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट १४३.७५ इतका प्रचंड होता. टी-२० फॉरमॅटमधून थेट ५० षटकांच्या स्थानिक सामन्यात उतरूनही हार्दिकने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून तो न्यूझीलंड दौऱ्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच काळानंतर ५० षटकांचा सामना खेळणाऱ्या हार्दिकने पहिल्याच डावात आपली फिटनेस आणि ताकद सिद्ध केली आहे. विशेषतः अर्धशतकानंतर त्याने ज्या वेगाने गिअर बदलला, ते पाहून आगामी आयसीसी स्पर्धांसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाचा विश्वास नक्कीच वाढला असेल.

११९ सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर ठोकलं पहिलं लिस्ट 'ए' शतक;

विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भाविरुद्ध खेळताना हार्दिकने केवळ वेगवान शतकच झळकावले नाही, तर आपल्या कारकिर्दीतील पहिले लिस्ट ‘ए’ (List A) शतक नोंदवून नवा इतिहास रचला आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत ११ पदरी (List A) क्रिकेटमध्ये एकूण ११९ सामने खेळले आहेत. या प्रदीर्घ प्रवासात त्याने २,३५० पेक्षा जास्त धावा केल्या असून त्याच्या नावावर १३ अर्धशतके जमा होती. मात्र, एका मोठ्या शतकी खेळीची त्याला प्रतीक्षा होती. राजकोटच्या मैदानावरील ही खेळी त्याच्यासाठी वैयक्तिकरीत्या अत्यंत महत्त्वाची ठरली असून, यामुळे त्याने आपला 'मॅच विनर' हा शिक्का पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. .

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत बुमराह-पांड्याला विश्रांती ?

भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेने करत आहे. मात्र, या मालिकेतून चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीने आगामी टी-२० विश्वचषक २०२६ चे महत्त्व लक्षात घेऊन, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना या मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी बुमराह आणि पांड्या हे भारताचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. गेल्या काही काळापासून दोघांच्याही फिटनेसवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. जसप्रीत बुमराह २०२३ च्या विश्वचषक फायनलपासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. हार्दिक पांड्या २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलपासून या फॉरमॅटपासून लांब आहे. दोन्ही खेळाडूंची तंदुरुस्ती भारतीय संघाच्या विजयासाठी कळीची ठरणार असल्याने, त्यांना 'वर्कलोड मॅनेजमेंट' अंतर्गत ब्रेक देण्यात आला आहे.

मालिका वेळापत्रक आणि ठिकाण

भारत आणि न्यूझीलंडमधील ही ३ सामन्यांची मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे:

  • पहिली वनडे : ११ जानेवारी – वडोदरा (कोटांबी स्टेडियम)
  • दुसरी वनडे : १४ जानेवारी – राजकोट (निरंजन शाह स्टेडियम)
  • तिसरी वनडे : १८ जानेवारी – इंदूर (होळकर स्टेडियम)

टी-२० मालिकेत होणार पुनरागमन?

मिळालेल्या माहितीनुसार, जरी हे दोन्ही खेळाडू एकदिवसीय मालिकेत खेळणार नसले, तरी त्यानंतर होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ते संघात परतण्याची शक्यता आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी ही टी-२० मालिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, संघ व्यवस्थापन त्यांना थेट तिथे मैदानात उतरवण्याच्या विचारात आहे.

Comments
Add Comment