धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात क्षुल्लक कारणावरून शालेय विद्यार्थ्यांमध्ये तूफान हाणामारी . विद्यार्थ्यी चक्क एकामेकांना लोखंडी सळ्या , फायटर आणि लाठ्या-काठ्यानी मारत होते . या थरारक हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. विद्यार्थी चक्क गुंडगिरीकडे वळत असल्याचे धक्कादायक चित्र व्हिडिओद्वारे समोर आलं आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब शहरातील एका नामांकित शाळेच्या परिसरात हा प्रकार घडला. किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला आणि त्याचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. दोन्ही गटातून जवळपास ३० विद्यार्थी हाणामारीत सहभागी होते. हे विद्यार्थी केवळ हातापायाने हाणामारी करत नव्हते, तर त्यांच्या हातात चक्क लोखंडी सळ्या, फायटर आणि लाठ्या-काठ्या होत्या. एखाद्या सराईत गँगस्टरप्रमाणे हे विद्यार्थी एकमेकांवर तुटून पडत होते.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कळंब शहरात खळबळ उडाली आहे. ज्या शाळेच्या परिसरात ही घटना घडली, त्या शाळेच्या शिक्षकांचे आणि प्रशासनाचे या विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही का? असा संतप्त प्रश्न पालकवर्ग विचारत आहेत. शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या बाहेर जर अशा प्रकारे जीवघेणी शस्त्रास्त्रे घेऊन विद्यार्थी फिरत असतील, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय? हा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
महत्वाचे म्हणजे दोन्ही गट आपसात भिडले असले तरी कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सुदैवाने ही हाणामारी सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली, यानंतर हे भांडण शांत झालं. या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली नाही. पण शाळेतील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे हाणामारी केल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.






