Friday, January 2, 2026

पैशाचं सोंग कमी पडलं...!

पैशाचं सोंग कमी पडलं...!
भालचंद्र कुबल, पाचवा वेद

आम्हा नाट्यनिरीक्षकांना सालाबादप्रमाणे यंदाही मागील वर्ष नाट्यसृष्टीस कसं गेलं? याचा आढावा घेण्याची वाईट खोड लागलेली आहे. खरे तर गाडलेले मुडदे उकरून काढण्याची ही प्रोसेस म्हणजे वरवरचे सिंहावलोकन असते. या असल्या सो कॉल्ड निरीक्षणाने नाट्यसृष्टीला काहीही फरक पडत नसतो. निर्मात्याला जे वाटतं तेच घडतं आणि तो ते घडवत राहतो. चाललं तर चालतं नाही तर पडतं, ते नाटक असतं. मागच्या वर्षी देखील असाच एक ‘कितीदा नव्याने तुला आठवावे’ असं काहीसं शिर्षक असलेला लेख लिहिला होता; परंतु गतस्मृतींचा आढावा, या पलीकडे त्याची दखल घेतली गेली नाही आणि का घेतली जावी? हा प्रश्नच आहे. नाट्यनिर्मिती ज्याला कळते तोच बहुदा या व्यवसायात उतरतो असं गृहित धरल्यास, व्यवसायाची गणितं नेमकी कुठे चुकतात ? हे विचारात घेणारा ‘फायनान्सर व्यावसायिक’ या नाट्यसृष्टीत एखादा महात्मा जन्माला यावा, तसा कधी कधीच किंवा तात्पुरता जन्माला येतो. एखादं नाटक जन्माला घालतो, ‘व्यावसायिक द्रष्टेपण’ नाट्यरसिकांवर लादतो आणि त्याच रसिकांनी ‘फालतू’ म्हणत ते नाटक लाथाडलं की, ‘लोकांना हल्ली नाटकातलंच कसं कळत नाही’ किंवा अपयशाचं खापर मग कुणाच्याही माथी फोडायला हा नाट्यनिर्माता सदैव तत्पर असतो. ही प्रस्तावना एवढ्याचसाठी की, २०२५ हे वर्ष नाट्य व्यवसायासाठी सुपर फ्लॉप ठरले. हे विधान माझे नसून या लेखाच्या निमित्ताने मी ज्या नाट्य अभ्यासकांशी बोललो त्यापैकी सांस्कृतिक कला दर्पणचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांचे आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे अंदाजे ७० ते ८० नाटकांची निर्मिती मागील वर्षात झाली. त्यातही पुनरुज्जीवित नाटकांनी थोडा फार धंदा केला, मात्र बाकीची नाटकं अपयशाची धनी ठरली. कित्येक नाटकांनी शासनाच्या अनुदान योजनेला अर्ज करूनही आवश्यक असलेला ठरावीक प्रयोगांचा पल्ला देखील गाठू शकली नाहीत. अगदी दिग्गज कलाकारांच्या पदरी अपयशाने ओटी भरली. दिगंबर नाईक अभिनित ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या नाटकाने तर दुसरा प्रयोग देखील पाहिला नाही. एक आणि एकमेव यशस्वी प्रयोग, असे लेबल या नाटकाच्या माथी लागले. ७ बेलवलकर, मी व्हर्सेस मी, सुंदर मी होणार, ज्याची त्याची लव स्टोरी, वजनदार अशा हेवीवेट नाटकांना आसमान बघायला लागलं.

व्यक्तिपूजेस पात्र असणारे पु. ल. काय किंवा तमाम महाराष्ट्रीय महिलांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या अलकाताई कुबल काय, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकल्या नाहीत. नाटक चालावे, जेणे करून चार पैसे त्या निर्मितीतील प्रत्येक घटकाला मिळावेत हाच तर या व्यवसायाचा मूलभूत हेतू मानला, तर त्यात नवनवे मार्केटिंग ट्रेंड आणले जाणे, तो हेतू साध्य करण्याचे समीकरण असते. असेच एक समीकरण टीव्हीवरील तुफान लोकप्रिय ठरलेल्या ‘हास्यजत्रे’च्या इर्दगिर्द लंगडताना आढळले. विषामृत, गंगा-यमुना, सरस्वती, ठरता ठरता ठरेना, थेट तुमच्या घरातून, दि दमयंती दामले यांपैकी काही नाटके तर साफ कोसळली. हास्यजत्रेतल्या कलाकारांना कॅश करून नाटक-धंदा करू शकेल हा अंदाज यंदा सपशेल फोल ठरला. नाही म्हणायला चार वर्षांपूर्वी कुर्रर्रर्रर्र नाटकांने हास्यजत्रेतल्या कलाकारांमुळे तिकीटबारी खणखणू शकत नाही, हे सिद्ध झाले असतानाही पुन्हा पुन्हा तोच प्रयोग करून बघण्याचा दिग्दर्शकीय आशावाद या वर्षीही दिसून आला. याला जबाबदार दिग्दर्शकच होते म्हणून दिग्दर्शकीय आशावाद...! पुरुषोत्तम बेर्डेंसारख्या अनुभवी दिग्दर्शकाचा अंदाज ‘गंगा यमुना सरस्वती’सारख्या नाटकाबाबत फोल ठरला. खरे तर दोन दिग्दर्शक २०२५मध्ये बरेच अपयशी ठरले. पहिले राजेश देशपांडे आणि दुसरे पुरुषोत्तम बेर्डे. माझ्या अशा या जाहीर विधानामुळे खोडरब्बर घेऊन बरेच जण सरसावतीलही; परंतु तिकीटबारीवरील डेटा या विधानाचा सोर्स आहे. मुक्काम पोस्ट आडगाव, तू भेटशी नव्याने, गंगा यमुना सरस्वती ही पुरुषोत्तम बेर्डेंची तर राजेश देशपांडे यांची तिकीटबारीवर हमखास हाऊसफुल्लची झळकणारी पाटी अधे-मध्ये उजळून येत होती. हिमालयाची सावली हे नाटक मात्र चांगले कलेक्शन करत आहे; परंतु सुंदर मी होणार या नाटकाने मात्र सर्व काही सुंदर असूनही निराशा केली. यंदाचे यशस्वी दिग्दर्शक ठरले विजय केंकरे...! पत्रापत्री ते सुभेदार गेस्ट हाऊस, असा निर्मात्याच्या कमाईला जिवंत ठेवणारा उत्पन्नाच्या आलेखाची नाटकं विजय केंकरेंनी दिली. बाकी मागील पानावरून पुढे येणारी पाच-सहा नाटके २०२५ मध्येही हाऊसफुल्ल धुमाकूळ घालतच होती. वस्त्रहरण, देवबाभळी, ऑल दि बेस्ट, पुरुष, वरवरचे वधु-वर, एका लग्नाची गोष्ट या नाटकांनी मराठी नाटकांच्या एकंदर ८० करोडच्या टर्नओव्हरला टेकू दिला. तसं बघायला गेलं तर भूमिका, जर तरची गोष्ट, शिकायला गेलो एक, कुटुंब कीर्तन ही सुपरहिट म्हटली जातील अशी नाटकं. पुनरुज्जीवित नाटकांची निर्मिती ही नाट्य व्यवसायाला सापडलेली किल्ली म्हणावी लागेल. सूर्याची पिल्ले, पुरुष, हिमालयाची सावली, तरुण तुर्क म्हातारे अर्क, शेवग्याच्या शेंगा, भ्रमाचा भोपळा, शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, ही नाटके रसिकांना अजूनही तोच आनंद देतात की, आधी कमावलेल्या गुडविलवर नव्याने स्वार व्हायला लावतात हा प्रश्नच आहे; परंतु पुनरुज्जीवित नाटके हा नाट्य व्यवसायासाठीचा एक पर्याय ठरायला हरकत नाही. याला अपवाद म्हणून बालनाट्येही या तोट्याच्या गणितात सामिल होती. आज्जीबाई जोरात, अंजू उडाली भुर्र, युद्ध आमुचे सुरू, अलबत्या गलबत्या ही बालनाट्यांच्या खर्चापुढे उत्पनाचे प्रमाण बऱ्यापैकी व्यस्त राहिले. यंदा एकपात्री नाट्यप्रयोगांचे पीक लक्षवेधी ठरले. सांगत्ये ऐका, मन, लाईट गेलीय का यांसारखे नाट्यप्रयोग वाहवा मिळवून गेले. प्रायोगिक नाटकांचा विचार करता, तीची गोष्ट, आता तू मला खा, तोत्तोचान, गोलकोंडा डायमंड्स, तोडी मिल फँटसी, या नाटकांनी लक्ष वेधून घेतले. मात्र अस्तित्व, असेन मी नसेन मी, रणरागिणी ताराराणी, दॅट्स द स्पिरीट, सविता दामोदर परांजपे या नाटकांमध्ये पोटँशिअल असूनही प्रेक्षक हवी तशी गर्दी करत नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली.

२०२५ हे वर्ष मराठी नाटकांसाठी सर्वार्थाने तोट्यांचे ठरले असे विधान आर्थिक, धोरणात्मक आणि रचनात्मक घडामोडींच्या आधारे सप्रमाण सिद्ध करता येऊ शकते, मात्र यातून समोर येणारे वास्तव निर्मात्यांना कदाचित अपमानास्पद तथा वादग्रस्त वाटू शकते. बुकमायशोसारख्या प्लॅटफॉर्मवर २०२५ मध्ये तिकीटविक्रीत जरी वाढ नोंदवली असली, तरी त्यात जुन्या हिट नाटकांवरील अवलंबित्व अधिक होते, तर नव्या मराठी नाटकांना तितकी आर्थिक सुरक्षितता मिळाली नाही. धोरणात्मक व उद्योग-स्थितीचे प्रश्न महाराष्ट्र सरकारने चित्रपट व नाट्य क्षेत्राला “इंडस्ट्री स्टेटस” देण्याचा निर्णय जाहीर केला. यामागील तर्कच असा होता की या क्षेत्राला आतापर्यंत न्याय, दर्जा व स्थिर रोजगार रचना मिळाली नव्हती, ती यथाशक्ती मिळावी. म्हणजेच २०२५ पर्यंतची नाटकांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे हे मान्य केली गेली होती. उद्योग दर्जा देण्याची घोषणा झाली तरी वर्षअखेरपर्यंत प्रत्यक्षात येणाऱ्या सवलती व संरचनात्मक बदलांविषयी स्पष्टता नसल्याने बहुतेक संस्थात्मक व व्यावसायिक नाट्यसंस्थांना गुंतवणूक आणि दीर्घकालीन नियोजनात अनिश्चितता भेडसावत राहिली. जुन्या नाटकांवर अवलंबित्व, संगीत देवबाभळीसारख्या २०१७ मधील नाटकाने २०२५ मध्ये डिजिटल व्हायरॅलिटीच्या जोरावर ९२ दिवसांत विशेष म्हणजे ९७ अधिकांश हाउसफुल्ल शो केले, यावरून नवीन प्रयोगांपेक्षा पूर्वीचेच हिट फॉर्म्युला अधिक सुरक्षित मानला गेला हे दिसून आले. जयवंत दळवींचे पुरुष सारखे ४० वर्ष जुने नाटक, विजय तेंडुलकरांचे सखाराम बाईंडर, २०२५ मध्ये दिल्लीसह अनेक शहरांत तुफान गर्दी खेचत होते, म्हणजे ज्या प्रमाणात जुन्या लेखकांची नाटकेही आताचे प्रेक्षक स्वीकारतात, मात्र समकालीन लेखक-दिग्दर्शकांची मुख्य प्रवाहातील नवी नाटके तितक्याच प्रमाणात पोहोचू शकलेली नाहीत ही वस्तुस्थिती कशी नाकारायची? हा सर्व डेटा मिळवून देण्याचं काम नाट्यअभ्यासक तथा मुंबई थिएटर गाईडचे प्रवक्ता रवी मिश्रा आणि भाविक शहा यांनी दिली, ज्यामुळे आपण खालील अनुमानापर्यंत पोहोचू शकलो आहोत. आजवरच्या नाटक इंडस्ट्रीच्या आर्थिक चढ-उताराबाबत ते अधिकारवाणीने बोलू शकतात याचे कारण जवळपास नाटकांशी निगडीत चार नाट्य महोत्सवांचे आयोजन ते करीत असतात. या आयोजनातून प्रेक्षकांचा अचूक कल एखाद्या नाटकाबाबत समजू शकतो, ज्याचा मला या लेखासाठी फायदा झाला. मनोरंजन बाजारपेठेतील एकूणच आर्थिक चढ-उतारांमुळे चित्रपटांप्रमाणेच नाटक क्षेत्रही आर्थिक दबावाखाली राहिले. ठरावीकच निर्मितींना भरगच्च प्रेक्षक मिळाले, उर्वरित बहुतेक निर्मितींसाठी हॉल भरणे, बुकिंग्स टिकवणे आणि पुढील दौर्यासाठी निधी उभा करणे हे मोठे आव्हान झेलत राहिले. निष्कर्षात्मक मांडणी एकीकडे काही जुन्या हिट नाटकांचे पुनरुज्जीवन, डिजिटल माध्यमातून वाढलेला रस व धोरणात्मक घोषणांनी सकारात्मक संकेत दिले असले तरी, या सर्वांनी नवीन मराठी नाटक निर्मितींच्या आर्थिक व संस्थात्मक तोट्याला पुरेशी भरपाई केली नाही. म्हणून २०२५ या वर्षात मराठी नाट्यव्यवसायाला झालेली गुंतवणुकीतली अनिश्चितता आणि नवीन नाटकांच्या तुलनेत जुन्या प्रयोगांवरील अवलंबित्व या सगळ्यांचा एकत्रित विचार करता २०२५ साली मराठी नाटकांनी अनेक सोंगं आणली पण पैशाचं सोंग तेवढं तोट्याचे ठरलं, हा माझा निष्कर्ष आहे...!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा