Monday, January 5, 2026

अफगाणिस्तानला पूराने झोडपले! १७ जण मृत्यूमुखी तर अनेकजण जखमी

अफगाणिस्तानला पूराने झोडपले! १७ जण मृत्यूमुखी तर अनेकजण जखमी

काबूल: अफगाणिस्तानला मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीने चांगलेच झोडपून काढले आहे. शहरात अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धक्कादायक म्हणजे या पुरात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झालेत. मुसळधार पावसामुळे मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ हम्मद यांनी सांगितले आहे.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद युसूफ हम्मद यांनी सांगितल्यानुसार, आठवड्याभरापासून बहुतेक मृत्यू पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये झालेत आणि तीव्र हवामानामुळे मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोहम्मद म्हणाले की, पुरामुळे प्रभावित जिल्ह्यांमधील पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक पशू-पक्षी मृत्युमुखी पडले असून १८०० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण समुदायांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

दरम्यान व्यवस्थापनाने सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात मूल्यांकन पथके पाठवली असून पुढील गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. भारताप्रमाणे अफगाणिस्तानदेखील हंगामी पावसानंतर अचानक आलेल्या पुरासाठी असुरक्षित आहे. देशात दशकांपासून सुरू असलेला संघर्ष, खराब पायाभूत सुविधा, जंगलतोड आणि हवामान बदलाचे वाढते परिणाम यामुळे अशा आपत्तींचा परिणाम वाढलाय. संयुक्त राष्ट्र आणि इतर संस्थांनी या आठवड्यात इशारा दिला होता की, २०२६ पर्यंत अफगाणिस्तान जगातील सर्वात मोठ्या मानवतावादी संकटांपैकी एक राहील. संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या मानवतावादी भागीदारांनी अफगाणिस्तानातील जवळजवळ १८ दशलक्ष गरजू लोकांना मदत करण्यासाठी १.७ अब्ज डॉलर्सच्या मदतीचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment