मुंबई: २०२६ मध्ये अभिनेता अक्षय कुमार विविध मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जॉली एलएलबी’, ‘हाऊसफुल ५’ आणि ‘केसरी चॅप्टर ५’ या सिक्वेल चित्रपटांसह तो ‘वेलकम टू द जंगल’मधून प्रेक्षकांना हसवणार आहे. अक्षय कुमारच्या आणखी एका बहुप्रतिक्षित चित्रपटाची चर्चा सुरू झाली असून, तो पुन्हा एकदा लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग होणार आहे.
अक्षय कुमार ‘ओह माय गॉड ३’ च्या तिसऱ्या भागात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून अभिनेत्री राणी मुखर्जी पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याची माहिती आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओह माय गॉड 3’च्या कथानकासाठी अमित राय यांनी पटकथा लिहिली असून, मागील दोन्ही भागांपेक्षा हा भाग अधिक भव्य, सध्याच्या घडामोडींशी संबंधित आणि प्रभावी असेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या दोन भागांच्या यशानंतर अक्षय कुमार पुन्हा या फ्रँचायझीचा भाग बनत आहे.
या तिसऱ्या भागात अक्षय कुमारसोबत राणी मुखर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाबाबतची चर्चा आणखी वाढली आहे. सध्या चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन सुरू असून, लवकरच शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘ओह माय गॉड’चा पहिला भाग २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात १४९.९० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागाने ६० कोटींच्या बजेटमध्ये २२१.५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.






