मुंबई : बंडखोरांना पक्षाच्या छत्रछायेत परत आणण्यासाठी भाजपने राबवलेल्या ‘ऑपरेशन मनधरणी’ला मोठे यश मिळाल्यानंतर आता पक्षाने ‘ऑपरेशन समर्थन’ हाती घेतले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ज्या बंडखोरांनी माघार घेतली नाही, अशा अपक्ष उमेदवारांची नाराजी दूर करून त्यांचे समर्थन अधिकृत भाजप उमेदवाराला मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे मतफुटी टाळून महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचा भाजपचा मानस आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपसह सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. अर्ज माघारीची मुदत संपण्यापूर्वी पक्षाने वरिष्ठ नेत्यांना पाठवून बंडखोरांची समजूत काढण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही अनेकांना फोन केले. त्यानंतर, बऱ्याच बंडखोरांनी माघार घेतली, मात्र काहीजण आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी, अनेक ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर पक्षाचेच अपक्ष बंडखोर रिंगणात उरले आहेत. आता या बंडखोरांना अनौपचारीकरित्या निवडणुकीतून बाजूला करून भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न ‘ऑपरेशन समर्थन’ अंतर्गत केला जाणार आहे.
महसूलमंत्री तथा भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “आम्ही शेवटपर्यंत बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता माघारीचे सर्व पर्याय संपले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची नाराजी आणि राग स्वाभाविक आहे. प्रत्येक इच्छुकाला तिकीट देणे शक्य नाही. आता झाले ते झाले विसरून, रिंगणात असलेल्या अधिकृत उमेदवारांचे समर्थन मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांची समजूत काढू.” चंद्रपुरात उमेदवार यादी परस्पर बदलली
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत उमेदवारांची यादी परस्पर बदलल्याप्रकरणी भाजपने जिल्हाध्यक्षांवर कठोर कारवाई केली आहे. त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात आले आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, “भाजपने ज्यांना उमेदवारी दिली आहे, ते शंभर टक्के निवडून येतील. मी स्वतः त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. सर्वांची समजूत काढली जाईल. आता तिकीटाचा विषय संपला आहे. भाजपचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
मित्रपक्षांविरोधातील लढतीचा महायुतीवर परिणाम नाही
राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत होत असली तरी याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, “मित्रपक्षांच्या विरोधात लढलो तरी महायुतीत कुठलेही मतभेद होणार नाहीत. समन्वय समितीच्या बैठकीत हे ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर टीका टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आतापर्यंतच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्ष किंवा नेत्यावर टीका केलेली नाही.”






