आई कुठे काय करते' ही लोकप्रिय मालिका दिग्दर्शित केल्यानंतर आता 'मॅजिक' हा सस्पेन्स थ्रिलर मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. या दोन्ही कलाकृतीचे दिग्दर्शक आहेत रवींद्र विजया करमरकर. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये मराठी माध्यमामध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे पुढील शिक्षण सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयमध्ये झाले. तेथून त्यांना नाटकाचे वेड लागले. कारण प्रोफेसर म्हणून त्यांना प्रवीण दवणे, अशोक बागवे यांसारख्या मातब्बर व्यक्ती होत्या. त्याच वेळेस त्यांना कविता वाचण्याचा छंद लागला. उदय सबनीस यांनी एक एकांकिका लिहिली होती, त्यामध्ये त्यांनी अभिनय केला होता. एकदा त्यांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये दिग्दर्शक विनय आपटे यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर त्यांनी विनय आपटे यांच्याकडे अभिनेत्री नाटकापासून सहाय्यक दिग्दर्शनाचे धडे घेतले. त्यानंतर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक त्यांनी केले. 'आभाळमाया' ही मालिका त्यांनी केली. तेथे मंदार देवस्थळी, श्याम मळेकर, भालचंद्र झा, विनय आपटे यांच्याकडून भरपूर गोष्टी ते शिकले.
एकदा एका नाटकाला गेले असता तिथे त्यांची ओळख दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांच्याशी झाली, त्यावेळी त्या 'प्रपंच' ही मालिका करणार होत्या. त्यांनी रवींद्रना त्या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून येण्यास सांगितले. हा त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर त्यांनी झोका, आनंदवन या मालिका केल्या. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक विश्राम सावंत यांच्याकडे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांनी दोन हिंदी चित्रपट केले. त्यापैकी एका चित्रपटाचे रामगोपाल वर्मा निर्माते होते. त्यांच्याकडून भरपूर गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. 'भाग्यविधाता' ही त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेली पहिली मालिका होती. नंतर चारचौघी, अनुबंध, होणार सून मी या घरची, आई कुठे काय करते या मालिका केल्या. 'आई कुठे काय करते' या मालिकेने इतिहास निर्माण केला. जवळपास साडेचार ते पाच वर्षे ही मालिका सुरू होती. त्यामध्ये दाखविलेली मूल्ये प्रेक्षकांना भावली. काही प्रेक्षकांना त्या मालिकेमध्ये अरुंधतीमध्ये, आई दिसली, तर काहींना तिच्यामध्ये सून दिसली. दिग्दर्शक अभिजीत पानसेसोबत 'ठाकरे' व 'रेगे' चित्रपटासाठी काम केले.
आता 'मॅजिक' चित्रपट आलेला आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे. या चित्रपटामध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे. त्याच्याकडून एका निरपराध व्यक्तीचे एन्काउंटर होते. त्याच्या दोन लहान जुळ्या मुली त्याने पाहिलेल्या आहेत. त्या मुली मोठ्या होऊन त्याला मारायला येतील अशी भीती वाटते. त्यापैकी एक मुलगी त्याच्यासमोर येते, तो तिचा खून करतो, त्यानंतर दुसरी मुलगी येते, ती डुप्लिकेट आहे, त्या दोघींनी काही प्लान केला आहे का? त्याच्या वडिलांना मारल्याची अपराधीपणाची भावना सतत त्याच्या मनामध्ये येत असते. त्याच्या मनामध्ये चाललेला भ्रम इतरांना कळत नाही. हा सस्पेन्स सायकॉलॉजिकल थ्रिलर असा चित्रपट आहे. या कथानकाला न्याय देणारा कलाकार म्हणून जितेंद्र जोशी याची निवड दिग्दर्शकाने केली. या व्यक्तिरेखेमध्ये जो अस्वस्थपणा आहे, तो मुळातच जितेंद्र जोशीकडे आहे, त्यामुळे त्याची या चित्रपटाच्या भूमिकेसाठी झाली. आठ चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाची निवड झाली होती. न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला व जितेंद जोशीला बेस्ट अँक्टरचे अवॉर्ड मिळाले आहे. या चित्रपटात दोन गाणी आहेत. या चित्रपटाचे शूटिंग कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, ठाणे, फिल्मसिटी मध्ये झाले. जुई भागवतचा हा खऱ्या अर्थाने पहिला चित्रपट आहे. हा सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सन मराठी चॅनेलवर 'संसार माझा रेखिते' ही त्यांची नवी मालिका सुरू झाली आहे. त्यात दीप्ती केतकर, हरीश दुधाने, संजीवनी जाधव हे कलाकार आहेत.