मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने आणि सतर्कतेने पार पाडावी. पारदर्शक निवडणुकीच्या अनुषंगाने नेमलेल्या सर्व समित्यांनी तत्पर राहून कार्य करावे. संपूर्ण मुंबईत नेमलेल्या स्थिर निगराणी पथकातील कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. तसेच, ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ अभियान प्रभावीपणे राबवून मतदारांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत शनिवारी ०३ जानेवारी २०२६ रोजी त्या बोलत होत्या. महानगरपालिकेचे सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, विविध परिमंडळांचे उपायुक्त, कोकण विभागाच्या अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक आयुक्त आदी या बैठकीस उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी यावेळी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान निश्चित सुविधांची लवकरात लवकर पूर्तता करावी. मतमोजणी केंद्रांचा सुनियोजित आराखडा तयार करावा. निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेत प्रशासनाने तत्पर राहावे तसेच विविध पथकांनी अत्यंत सक्रियपणे आणि दक्षतेने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
तर, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राबविण्यात आलेल्या ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ अभियानाची या निवडणुकीतही प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांपर्यंत त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती पोहोचेल, हे सुनिश्चित करावे, असे निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी दिले.






