गुवाहाटी: बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ हे शुक्रवारी रात्री गुवाहाटीतील झू रोड परिसरात झालेल्या रस्ते अपघातात जखमी झाले. शुक्रवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ‘द गुवाहाटी ॲड्रेस’ हॉटेलसमोर हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदमारीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एव्हेंजर दुचाकीने रस्ता ओलांडत असताना आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांनाही दुखापती झाल्या असून, दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच गीतानगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीवरही वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ हे हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये जेवण करून बाहेर पडत असताना रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी हा अपघात घडला.
आशिष विद्यार्थी यांचं फिल्मी करिअर चार दशकांहून अधिक काळ विस्तारलेलं आहे. त्यांनी ११ पेक्षा अधिक भाषांमध्ये ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. १९८६ मध्ये कन्नड चित्रपट ‘आनंद’मधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली, तर हिंदी सिनेसृष्टीत १९९४ मधील ‘द्रोहकाल’ चित्रपटातून त्यांना विशेष ओळख मिळाली. या भूमिकेसाठी त्यांना १९९५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
दमदार खलनायक आणि प्रभावी चरित्र भूमिकांसाठी ओळखले जाणारे आशिष विद्यार्थी यांनी १९४२: अ लव्ह स्टोरी, वास्तव, काहो ना… प्यार है! आणि हैदर यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयासोबतच ते मोटिव्हेशनल स्पीकर असून, लोकप्रिय फूड आणि ट्रॅव्हल व्लॉगर म्हणूनही सक्रिय आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सध्या सुमारे २४ लाख सबस्क्रायबर्स असून, ते आसाम आणि ईशान्य भारतातील विविध भागांचे व्हिडिओ नियमितपणे शेअर करत असतात.






