Saturday, January 3, 2026

ताम्हिणी घाटात अपघाताचे सत्र सुरूच

ताम्हिणी घाटात अपघाताचे सत्र सुरूच

सकाळी बस डोंगराला आदळली ; संध्याकाळी गाडी दरीत कोसळली

प्रमोद जाधव माणगाव : नववर्षाच्या पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे-भोसरी येथील एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला शुक्रवारी सकाळी ११ वाजता ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डोंगराला धडकली, ज्यामध्ये सुमारे ५० प्रवासी जखमी झाले आहेत. तर संध्याकाळच्या वेळेस एक कार दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील 'सावन आय.बी. ऑटोव्हिंग प्रा. लि. (शिव महिंद्रा)' शोरूममधील कर्मचारी दोन खासगी बसने रायगडमधील काशीद बीचकडे सहलीसाठी निघाले होते. ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावच्या हद्दीत असलेल्या एका अवघड वळणावर बस वरील चालकाचे नियंत्रण सुटले. बस वेगात असल्याने ती थेट डोंगराच्या कडाला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्यासह पोलीस पथक तातडीने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांतून उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे हलवले. गंभीर जखमींना तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार केले जात आहेत.

]तसेच दुसरी घटना म्हणजेच कोंडेथर गावच्या हद्दीत एका हुंडाई ऑरा कारचा भीषण अपघात झाला असून, कार खोल दरीत कोसळल्याने चालक बालाजी याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची भीषणता इतकी होती की कार थेट खोल दरीत जाऊन कोसळली आणि तिचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत घ्यावी लागली. अखेर ड्रोनच्या सहाय्याने गाडीचे नेमके ठिकाण सापडले.

पुन्हा त्याच ठिकाणी अपघात

नोव्हेंबर महिन्यात याच ठिकाणी पुण्यातील एका 'थार' गाडीचा भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये सहा तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता. शुक्रवारी झालेला अपघात अगदी त्याच जागेवर झाला असून, नवी कार नेमकी जुन्या थार गाडीच्या बाजूलाच जाऊन पडली आहे. थारच्या अपघातानंतरही प्रशासनाने या ठिकाणी कोणतेही बॅरिगेट्स किंवा संरक्षक भिंत उभारली नव्हती, ज्यामुळे हा दुसरा बळी गेला असल्याचा संताप स्थानिक व्यक्त ' करत आहेत.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

ताम्हिणी घाटात सातत्याने होणारे हे अपघात आता चिंतेचा विषय बनले आहेत. कोंडेथर हद्दीतील हे वळण अत्यंत धोकादायक असून प्रशासनाने येथे तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Comments
Add Comment