Monday, January 5, 2026

सहा किलोमीटरची जीवघेणी पायपीट, बाळाचा पोटातच मृत्यू, टाहो फोडत आईनंही जीव सोडला

सहा किलोमीटरची जीवघेणी पायपीट, बाळाचा पोटातच मृत्यू, टाहो फोडत आईनंही जीव सोडला

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे एका नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगा हिला प्रसूतीसाठी वेळेवर वैद्यकीय मदत मिळू न शकल्याने प्राण गमवावे लागले.

आलदंडी टोला या गावात रस्ता नसल्यामुळे आशा किरंगा नववर्षाच्या दिवशी पतीसोबत जंगलातील वाटेने तब्बल सहा किलोमीटरची पायपीट करत पेठा येथील बहिणीच्या घरी जाण्यास निघाल्या होत्या. मात्र या दीर्घ पायपीटीचा त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून हेडरी येथील कालीअम्माल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तात्काळ सिझेरियन शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पोटातच बाळाचा मृत्यू झाला असून, रक्तदाब वाढल्याने काही वेळातच आशा किरंगा यांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

शवविच्छेदनासाठी माय-लेकांचे मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे कारण देत मृतदेह ४० किलोमीटर अंतरावरील अहेरी येथे पाठवण्यात आले. जिवंतपणी रस्त्याअभावी करावी लागलेली पायपीट मृत्यूनंतरही थांबली नाही,

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुर्गम भागात रस्ते, आरोग्य केंद्रे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता यामुळे निष्पाप जीव गमवावे लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तातडीने पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment