Monday, January 5, 2026

२९ महापालिकांमध्ये ३५.७ टक्के बंडखोरांची माघार

२९ महापालिकांमध्ये ३५.७ टक्के बंडखोरांची माघार

राज्यातील ८९३ प्रभागांत १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात; मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक स्पर्धा

मुंबई : राज्यात दीर्घकाळाने होत असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. मात्र, यातील अनेक बंडखोरांना थंड करण्यात सर्वपक्षीयांना, विशेषतः भाजपला यश मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. त्यानुसार, २९ महानगरपालिकांमधील एकूण ८९३ प्रभाग आणि २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. वैध ठरलेल्या २४ हजार ७७१ अर्जांपैकी ८ हजार ८४० म्हणजे ३५.७ टक्के उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. सरासरी प्रत्येक जागेसाठी ५.५५ उमेदवार लढत असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.

देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत सर्वाधिक स्पर्धा दिसून येत आहे. येथील २२७ प्रभागांमध्ये २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाली होती. त्यापैकी २ हजार १५३ वैध ठरली, तर ४५३ उमेदवारांनी माघार घेतली. आता १ हजार ७०० उमेदवार रिंगणात आहेत. येथे प्रत्येक जागेसाठी सरासरी ७.४९ उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. पुणे महानगरपालिकेतील ४१ प्रभाग आणि १६५ जागांसाठी ३ हजार ६१ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार १३४ वैध ठरले, तर ९६८ जणांनी माघार घेतली आणि आता १ हजार १६६ उमेदवार रिंगणात आहेत. नागपूरमधील ३८ प्रभाग आणि १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकमध्ये अर्जांचे प्रमाण सर्वाधिक असले तरी माघारीचे प्रमाणही मोठे (६६१) असल्याने स्पर्धा काहीशी कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ८५९, तर पनवेलमध्ये सर्वात कमी २५५ उमेदवार रिंगणात आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >