मुंबई : राज्यातील सुमारे २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची तातडीने ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामाबरोबरच आता शिक्षकांना अपार आयडी नोंदणीचे कामही युद्धपातळीवर करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांचे डिजिटल पद्धतीने ट्रॅकिंग करणे, शैक्षणिक प्रगतीचे निरीक्षण, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विविध बाबींचे संनियंत्रण करण्यासाठी अपार आयडी नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांचे अपार आयडी यू-डायस प्लस प्रणालीमार्फत काढण्याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
यू-डायस प्लस प्रणालीच्या १ जानेवारी २०२६ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील १८४ लाख २१ हजार (८५.५ टक्के) विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून २०४ लाख ८२ हजार (९५ टक्के) विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले आहे. तसेच शाळेतील पूर्वप्राथमिक व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी अद्याप नोंदणी केली नसल्याचे अहवालावरून निदर्शनास येत आहे. अहवालानुसार २९ लाख ८ हजार विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत अपार आयडी काढण्यासाठी नोंदणी केली नसल्याचे स्पष्ट झाले.






