चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार
नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी वर्षातील पहिले पौर्णिमेचे चंद्रदर्शन घडणार आहे. या दिवशी वर्षातील पहिला सुपरमून असेल. तो इतर पौर्णिमेपेक्षा खूप मोठा असेल. याला वुल्फ मून असेही म्हणतात. विशेष म्हणजे, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार असल्याने तो 'सुपरमून'च्या रूपात अवकाशात तळपताना दिसेल. स्वच्छ आकाश असल्यास संपूर्ण देशभरात हे विहंगम दृश्य दिसेल.
सामान्य पौर्णिमेच्या साधारण १४% मोठा!
हा केवळ २०२६ चा पहिलाच पूर्ण चंद्र नसेल, तर वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र असणार आहे. या दिवशी चंद्र त्याच्या कक्षेतील पृथ्वीपासूनच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असेल. त्यामुळे तो सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा साधारण १४% मोठा आणि ३०% अधिक तेजस्वी दिसेल.
भारतीय प्रमाणवेळेनुसार ३ जानेवारी रोजी दुपारी ३:३३ वाजता चंद्र पूर्णत्वास पोहोचेल. मात्र, भारतात याचे खरे विलोभनीय रूप सूर्यास्तानंतर, म्हणजेच चंद्रोदयाच्या वेळी पाहायला मिळेल. २ आणि ३ जानेवारीच्या संध्याकाळी चंद्र पूर्व क्षितिजावर नेहमीपेक्षा थोडा खाली दिसेल. यामुळे उगवणारा चंद्र आकाराने मोठा, अधिक सोनेरी आणि पृथ्वीच्या अगदी जवळ असल्यासारखा वाटतो. भारतात संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास हा सुपरमून दिसू लागेल आणि रात्रभर आकाशात प्रकाशमान असेल.
स्वच्छ आकाश असल्यास, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बंगळूरु यांसारख्या शहरांसह संपूर्ण देशभरात हे विहंगम दृश्य दिसेल.






