मुंबई : मुंबईनजिक पालघर जिल्ह्यातील नायगावात एका सलूनमध्ये 'कश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणे वाजवल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, मुंबईत राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांची मस्ती देवाभाऊंचे बुलडोझर उतरवतील, असा इशाराही दिला आहे.
१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक पंकज किलजे गस्तीवर असताना, त्यांना 'रूहान हेअर कटिंग सलून'मधून 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हे वादग्रस्त गाणे ऐकू आले. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी परिसरात हा प्रकार घडला. हे गाणे पाकिस्तानच्या 'इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स'ने भारताच्या विरोधात प्रोपेगेंडा म्हणून तयार केलेले आहे. हे गाणे वाजवून भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हान दिले जात असल्याचे तसेच समाजात द्वेष आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह (वय २५) या आरोपीला अटक केली. तो मूळचा आझमगढ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. आरोपी आपल्या मोबाईलवरून ब्लूटूथद्वारे स्पिकरवर हे गाणे मोठ्या आवाजात लावत होता, जेणेकरून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना ते ऐकू जावे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने सलूनवर छापा टाकून आरोपीचा मोबाईल जप्त केला, ज्यामध्ये हे गाणे सुरू असल्याचे आढळले. नायगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९७(१)(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
मंत्री नितेश राणे संतप्त
राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी या प्रकाराबाबत चीड व्यक्त केली. "मुंबईत राहून 'कश्मीर बनेगा पाकिस्तान'चे नारे चालणार नाहीत. यांची सगळी मस्ती आमच्या देवाभाऊचे बुलडोझर उतरवतील! जय श्री राम", असा इशारा त्यांनी दिला.






