सुधागड पाली : थर्टी फर्स्ट म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा हातात दारूचा ग्लास व डीजेच्या तालावर डोलणारी तरुणाई व नागरिक दिसतात. मात्र पालीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र अध्यक्ष व भाजप सुधागड तालुका युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश आपटे यांच्यातर्फे तब्बल साडेतीनशे लिटर दुधाचे मोफत वाटप करून प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे शेकडो लोक दारू ऐवजी दूध प्यायले. 'संकल्प नववर्षाचे स्वागत व्यसनमुक्त जीवनाचे व्यसन सोडा दूध प्या'या उपक्रमाला पालीत चांगला प्रतिसाद लाभला.
पाली नगरपंचायत कार्यालयाच्या जवळील प्रांगणात संध्याकाळी ५ ते ७च्या दरम्यान मोफत दूध वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह तब्बल सातशे लोकांनी उपस्थिती नोंदवली. या विशेष सामाजिक उपक्रमाअंतर्गत 'दारू सोडा, दूध प्या 'या संकल्पनेतून एक अत्यंत प्रबोधनात्मक व सामाजिक संदेश देणारा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेणसेकर, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आरिफ मणियार, भाजप पाली शहराध्यक्ष सुशील शिंदे, जेष्ठ कीर्तनकार धनंजय गद्रे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिकांनी आपली उपस्थिती लावली. या अनोख्या प्रबोधनात्मक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः थर्टी फर्स्टच्या निमित्ताने दारू पार्टी व अन्य व्यसनांचे प्रमाण वाढते. मात्र या व्यसनांचे दुष्परिणाम गंभीर असून अनेक तरुण त्याला बळी पडत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये तसेच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांची व्यसनमुक्ती व्हावी, या उद्देशाने आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र, पुणे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे अंकुश आपटे यांनी सांगितले.