Monday, January 26, 2026

संत मीराबाई

संत मीराबाई

डॉ. देवीदास पोटे

हरी गुण गावत नाचूंगी हरि गुन गावत नाचूंगी ॥ अपने मंदिर मों बैठ बैठकर। गीता भागवत बाचूंगी ॥१॥ ग्यान ध्यानकी गठरी बांधकर। हरीहर संग मैं लागूंगी ॥२॥ मीरा के प्रभु गिरिधर नागर। सदा प्रेमरस चाखुंगी ॥३॥

संत मीराबाईंचा काळ मध्ययुगातला. तिचा जन्म इ. स. १५१२ मधला. राजस्थानातील मेवाड हे तिचं जन्मस्थळ. मीरा बालपणापासूनच भावनाशील आणि संवेदनशील होती. भक्तीच्या वाटेवरील विरह वेदनात जळत राहणं, हेच मीराबाईंच्या आयुष्यातील अटळ भागध्येय होतं. विरहवेदना हाच जणू तिच्या साधनेचा मार्ग होता. या पदात मीराबाई म्हणते, ‘‘ हरीचं गुणगाण गात मी आनंदात नाचत राहीन. मंदिरात बसून गीता, भागवत यांचं वाचन करीन. ज्ञान आणि ध्यान यांचा एकाकार सांगून मी हरिहरांचा संग प्राप्त करीन. तो गिरिधर माझा प्रभू आहे. या भक्तीरंगातील प्रेमरसाचे मी अखंड सेवन करीन. ’’ मीराबाई हे भारताच्या आध्यात्मिक परंपरेला पडलेले एक भावविभोर स्वप्न आहे. वीणेच्या तारा छेडल्यानंतर प्रकट होणारे भक्तिभाव हे तिच्या भक्तिभावाचं एकसंध रुप आहे. या भक्तीला स्वरांचा हळूवार संग आहे आणि नृत्याची आंतरिक सहज लय आहे. भक्तीचा अत्यंत उत्कट भाव हे तिच्या भक्तिमय आयुष्याचं सूत्र आहे. परमेश्वराला पती मानून त्याच्याशी मधूर भक्तीच्या भावाने समरस होणे हा तिच्या भक्तिरंगाचा गाभा आहे. तिची ही भक्तीची वाटचाल म्हणजे तिच्या संवेदनशील मनाची समर्पण यात्राच आहे. कृष्णाच्या भक्तीत मीराबाईंच्या चित्तवृत्ती तल्लीन होते. अंतरंगात आनंदाच्या लहरी उमटत ती पूर्ण एकाग्र होई. तिचे अस्तित्व फुलून येई. लग्नानंतरही तिचे भक्तिरंग थांबले नाहीत. एकतारी घेऊन, धुंद होऊन ती नाचू लागली. गाऊ लागली. ‘कृष्णबावरी’ होऊन त्या सावळ्या कान्ह्याला ती आळवू लागली. ती पूर्णपणे कृष्णमय झाली. कृष्णमय झालेली मीरा भागवतातली नायिका होऊन आपल्याला तिच्या काव्यातून भेटते. गोकुळातील कृष्णाची विविध रुपे तिला मोहित करतात. संत मीराबाई हे उत्कट, भावपूर्ण आणि समर्पित भक्तीचं अजरामर असं प्रतीक आहे.

Comments
Add Comment