मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वरिष्ठांनी समजूत काढल्यानंतर
काही बंडखोरांनी पक्षाच्या नेत्यांचा मान राखत आपला अर्ज मागे घेतला, तर काही उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठामच राहिल्याने काही ठिकाणी बंडोबा थंड झाल्याचे दिसून आले तर काही बंडोबा आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये अर्ज छाननीनंतर २२३१ अर्ज पात्र ठरले होते. तर १६७ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे या २२३१ अर्जांपैंकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारी दुपारी तीन पर्यंत काही बंडखोरांनी तसेच अपक्षांनी आपले अर्ज मागे घेतले तर काही ठिकाणी ते निवडणूक लढण्यास ठाम आहेत.
उबाठा, शिवसेना, भाजपा तसेच मनसेमध्ये मोठ्याप्रमाणात बंडखोरी झाली असून भाजपामध्ये ५६ बंडखोर होते, त्यातील ८० टक्के बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर प्रभाग क्रमांक १९३मधून उबाठाचे बंडखोर सुर्यकांत कोळी, प्रभाग क्रमांक १९७मधून श्रावणी देसाई यांनी माघार घेतली असली तरी प्रभाग क्रमांक १९६मधून संगीता जगपात यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. तसेच परळमधील माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्या विरोधात प्रभाग क्रमांक २०२मधून बंडखोरी करणारे उबाठाचे शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनी अर्ज मागे घेतलेला नाही. तर प्रभाग क्रमांक २२५मधून भाजपाच्या बंडखोर कमलाकर दळवी यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे, मात्र शिवसेनेच्या सुजाता सानप यांनी अर्ज मागे घेतलेला नाही. प्रभाग क्रमांक ९५मधून उबाठाचे माजी नगरसेवक बंडखोर शेखर वायंगणकर यांनीही आपला अर्ज न घेता उबाठाचे हरि शास्त्री यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.तसेच प्रभाग क्रमांक २२६मधून शिवसेनेचे दीपक पवार यांची पत्नी तेजल पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या प्रभागात शिवसेना आणि भाजपात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.या प्रभागात भाजपाचे ऍड मकरंद नार्वेकर हे अधिकृत उमेदवार आहे. तर प्रभाग क्रमांक १७७मधून भाजपाच्या माजी नगरसेवक बंडखोर नेहल शाह यांनीही अर्ज मागे न घेतल्याने भाजपाचे कोठारी यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.
तर प्रभाग ११४मधून उबाठा शिवसेनेच्या राजुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने मनसेच्या अनिषा माजगावकर आणि उबाठाच्या वापारे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता,त्यातील वापारे यांनी अर्ज मागे घेतला तर अनिषा माजगावकर या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. तसेच १०९मधून उबाठा शिवसेनेचे सुरेश शिंदे यांच्या विरोधात उबाठाच्या माजी नगरसेविका संगीता गोसावी यांनी बंडखोरी केली होती, परंतु तिथे आपला अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. तर प्रभाग क्रमांक २२१मधून भाजपाचे आकाश पुरोहित यांच्या विरोधात भाजपाचे जनक संघवी यांनी अर्ज दाखल केला होता, परंतु संघवी यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०६मधून मनसेचे सत्यवान दळवी यांच्या विरोधात उबाठाचे सागर देवरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु आता पक्षांच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर देवरे यांनी अर्ज मागे घेतला. प्रभाग क्रमांक २००मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार संदीप पाणसांडे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाचे गजेंद्र धुमाळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता, अखेर धुमाळे यांनी आपला अर्ज मागे घेतला.






