वार्तापत्र मराठवाडा : डॉ . अभयकुमार दांडगे
पालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला. बऱ्याच पक्षांना बंडखोरीचाही सामना करावा लागला. काही ठिकाणी युती आणि आघाडी झाली, तर काही ठिकाणी अनेक पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर आलेे, तर किती उमेदवार आपला अर्ज माघारी घेतील, हे आज ३ वाजेपर्यंत कळणार आहे.
राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांत इच्छुकांची गर्दी वाढली होती. मराठवाड्यातील ८ पैकी ५ जिल्ह्यांत महापालिका असून त्या ठिकाणी सर्वच पक्षांकडे उमेदवारांची भरमसाट गर्दी झाली. विशेष म्हणजे भाजपकडे प्रत्येक प्रभागात ३० ते ४० पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अनेकांनी निवडणूक लढविण्यासाठी गर्दी केली. अनेकांना मनाप्रमाणे तिकीट न मिळाल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांत अनेकांनी बंडखोरी केली. मराठवाड्यात एकापाठोपाठ एक असे राजकीय भूकंप झाले. त्यामुळे अनेकांनी स्वतःचे पक्ष सोडून भाजप - शिवसेनेचे दोन गट तसेच राष्ट्रवादीच्या दोन गटात प्रवेश घेतला. यामुळे अनेकांनी आपल्या सोयीप्रमाणे पक्ष बदलले. पक्षातील नेत्यांनी देखील 'आला तो आपला' या भूमिकेतून सर्वांनाच पक्षात सामावून घेतले. स्वतःच्या पक्षात इनकमिंग होत असल्याने नेत्यांना त्यावेळी आनंद झाला; परंतु आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तिकीट वाटप करताना सर्वच पक्षाची व नेत्यांची मोठी गोची झाली. सगळ्यांनाच तिकीट देणे शक्य नसल्यामुळे रातोरात पक्षातील कार्यकर्त्यांनी कोलांटउड्या माराव्या याप्रमाणे पक्ष बदलले. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, परभणी व लातूर या सर्व ठिकाणी बंडखोरांनी उच्छाद मांडला. मराठवाड्यात भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक पाहावयास मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे तसेच खा. डॉ. भागवत कराड यांच्या वाहनांना घेराव घातला. उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आला, जवळच्या लोकांना तिकिटे दिली असा आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केला, तर नांदेडमध्ये खा. अशोकराव चव्हाण यांच्या हातात भाजपने कमान दिल्यामुळे त्यांनी पूर्वीच्या काँग्रेसच्या लोकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना तिकीटे दिली.
मराठवाड्यात उमेदवारांची धांदल उडाली असली तरी नाराज कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तरीदेखील २ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यावेत यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी सुरू केली. मराठवाड्यात दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षाला अनेक ठिकाणी उमेदवार देखील मिळाले नाहीत. काँग्रेसने वंचित आघाडीसोबत राहून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अनेक ठिकाणी उमेदवारांसाठी मनधरणी करावी लागली. छत्रपती संभाजीनगर तसेच नांदेडमध्ये एमआयएम या पक्षाने अनेकांना उमेदवारी देऊन जातीय समीकरण मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. जालन्यात महानगरपालिका निवडणुकीत महायुती तुटल्याची घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तासापूर्वीच करण्यात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. भाजप वगळता इतर पक्षांना सर्वच जागांवरील उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक विभागाकडे जमा करता आले नाहीत. शिवसेनेच्या ६२ उमेदवारांचे अर्ज त्या ठिकाणी दाखल झाले; परंतु इतर तिघांना पुरस्कृत म्हणून उभे करण्याची वेळ आली. लातूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील जगावाटपाचा पेच सुटू शकला नाही. युती तुटल्याने सर्वच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले. त्यामुळे प्रबळ उमेदवारांचा अभाव अनेक ठिकाणी दिसून आला.
नांदेडमध्ये खा. अशोक चव्हाण यांच्याकडे भाजपने उमेदवार निवडण्याची तसेच एबी फॉर्म दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या घरासमोर राडा केला. लातूर महानगरपालिकेतही एक वेगळे चित्र पाहावयाला मिळाले. अनेक पक्षांना सर्व जागांवर लातूरमध्ये उमेदवारही देता आले नाही. भाजपने स्वबळावर सर्व सत्तर जागांवर उमेदवार दिले आहेत. तसेच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला दहा जागांवर उमेदवार सापडले नाहीत. त्यांना ६० जागांवर समाधान मानावे लागले. तर शिंदे सेनेला लातूरमध्ये केवळ ११ उमेदवार उभे करता आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याची जबाबदारी घेतली. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः अनेक कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी अनेकांना स्वतः संपर्क साधून भविष्यात चांगली संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना बऱ्यापैकी यश आले. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व नांदेड या दोन जिल्ह्यांतील बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपच्या नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील बरीच मेहनत घ्यावी लागली. शुक्रवार २ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अनेक बंडखोरांना शांत करण्यात यश येईल असे भाजपकडून सांगितले जात आहे. मराठवाड्यात अनेक नेत्यांची मुले तसेच त्यांचे नातलग रिंगणात उतरल्याने निष्ठावंत कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. याचा फटका सर्वच पक्षाला बसू शकतो असे आजघडीला दिसून येत आहे. अशाच कारणावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज झालेले प्रशांत भदाणे यांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच एका महिलेने एका पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार महानगरपालिकेत खरेच नगरसेवक म्हणून सेवा करण्यासाठी आहे, की यामागे अन्य काही हित आहे, असा प्रश्नही अनेकांना पडलेला आहे.