Wednesday, January 28, 2026

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीचा झेंडा फडकला

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीचा झेंडा फडकला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत रत्नदुर्ग पिस्टल आणि रायफल शूटिंग क्लबचा होतकरू नेमबाज स्वयं विक्रांत देसाई याने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल – ज्युनिअर सिव्हिलियन प्रकारात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत स्वयंने देशातील अव्वल नेमबाजांमध्ये आपली अचूक छाप उमटवली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ज्युनिअर सिव्हिलियन संघात स्वयं विक्रांत देसाई यांसह साईराज काटे आणि प्रांशू सूर्यवंशी यांची निवड झाली होती. या तिघांनीही अत्यंत काट्याच्या लढतीत विलक्षण एकाग्रता, वेग आणि अचूकतेचे प्रदर्शन करत संघाला यशाच्या शिखरावर नेले.

त्यांच्या सामूहिक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाला कांस्य पदक मिळवण्यात यश आले. स्वयं देसाईची ही कामगिरी त्याच्या नेमबाजी कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानली जात असून, रत्नागिरी जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरली आहे. या यशाबद्दल स्वयंचे क्रीडा वर्तुळातून अभिनंदन होत असून, भविष्यात तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment