Friday, January 2, 2026

Middle East Crisis Gen Z Protest : नव्या वर्षाच्या पहाटेच इराणमध्ये 'जनक्रांती'चा भडका! Gen Z रस्त्यावर, महागाई आणि बेरोजगारीने संतापाचा कडेलोट; खोमेनी सरकार हादरले!

Middle East Crisis Gen Z Protest : नव्या वर्षाच्या पहाटेच इराणमध्ये 'जनक्रांती'चा भडका! Gen Z रस्त्यावर, महागाई आणि बेरोजगारीने संतापाचा कडेलोट; खोमेनी सरकार हादरले!

तेहरान : जगभरात तरुणाईने सत्तापालट घडवण्याचे सत्र सुरू असतानाच आता मध्य-पूर्वेतील इराणमध्येही क्रांतीची ठिणगी पडली आहे. अयातुल्ला खोमेनी यांच्या कट्टरपंथी राजवटीविरोधात इराणची नवी पिढी (Gen Z) आणि महिला आक्रमक झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या स्वातंत्र्याची होणारी गळचेपी आणि आता कोसळलेली देशाची आर्थिक स्थिती, या दुहेरी संकटामुळे नागरिक रस्त्यावर उतरले असून इराणमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. इराणची आर्थिक स्थिती कमालीची नाजूक झाल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. या महागाई आणि बेरोजगारीविरोधात तरुणाईने गुरुवारी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. हे लोण केवळ शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातही पसरले आहे. आतापर्यंत या संघर्षात सहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. २०२२ मधील हिंसक आंदोलनानंतरची ही सर्वात मोठी निदर्शने मानली जात आहेत. "स्वातंत्र्य आणि भाकरी" या दोन प्रमुख मागण्यांसाठी इराणची तीन मोठी शहरे सध्या आगीच्या विळख्यात आहेत. आंदोलकांनी अनेक ठिकाणी सरकारी मालमत्तेची तोडफोड करत प्रशासकीय दडपशाहीला आव्हान दिले आहे. नेपाळ आणि इतर काही देशांमध्ये ज्याप्रमाणे तरुणांनी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना पायउतार होण्यास भाग पाडले, त्याच धर्तीवर इराणमध्येही जनक्षोभ उसळला आहे.

लोरेस्तानमध्ये गोळीबार आणि आगडोंब; ६ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

इराणमध्ये चार वर्षांपूर्वी महसा अमिनीच्या मृत्यूने पेटलेली ठिणगी आता एका महाभयंकर वणव्यात रूपांतरित झाली आहे. इराणच्या सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेच्या मनात असलेला अनेक वर्षांचा संताप आता उफाळून आला असून, विशेषतः लोरेस्तान प्रांतात परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. सरकारी माध्यमांनी ६ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली असली, तरी जमिनीवरील परिस्थिती यापेक्षाही गंभीर असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये शहरांच्या रस्त्यांवर युद्धसदृश परिस्थिती दिसत आहे. आंदोलक तरुणांच्या टोळ्या अयातुल्ला खोमेनी यांच्या राजवटीच्या विरोधात उघडपणे घोषणाबाजी करत आहेत. अनेक ठिकाणी वाहनांना आग लावण्यात आली असून, गोळीबाराच्या आवाजांनी संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. इराणमधील सरकारी वृत्तसंस्था या हिंसाचाराचा तपशील लपवत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, नागरिकांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओंनी जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओंमध्ये सुरक्षा दलांकडून होणारा बळाचा वापर, धुराचे लोट आणि जखमी आंदोलकांची विदारक दृश्ये दिसत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार ६ मृत्यू सांगितले जात असले, तरी जखमींचा आकडा शेकडोंच्या घरात आहे. यावेळी केवळ महिलाच नव्हे, तर देशातील तरुणाईने आर्थिक संकट आणि दडपशाहीविरोधात आरपारची लढाई सुरू केल्याचे चित्र आहे.

१०० हून अधिक पिस्तूलं जप्त, राजेशाही समर्थक आणि निदर्शकांमध्ये तुंबळ हाणामारी

इराणच्या सरकारी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत १०० हून अधिक पिस्तूलं आणि इतर शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे आंदोलनामध्ये शस्त्रांचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले असून परिस्थिती अधिकच स्फोटक बनली आहे. इराणमध्ये सध्या बहुआयामी संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे राजेशाही समर्थक (Pro-monarchy) आणि दुसरीकडे युरोपीय लोकशाहीच्या बाजूने झुकलेले गट यांच्यात अनेक ठिकाणी हिंसक चकमकी झाल्या आहेत. या दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ले चढवल्याने शहरांमध्ये तणाव वाढला आहे. याप्रकरणी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर धरपकड केली असून, अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना तेहरान शहराबाहेरील दुर्गम तुरुंगांमध्ये डांबण्याचे कठोर आदेश देण्यात आले आहेत. हे आंदोलन केवळ आर्थिक कारणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. सुरुवातीला महागाई आणि बेरोजगारीवर आधारित असलेल्या या उठावात आता अयातुल्ला खोमेनी यांच्या धार्मिक कट्टरतावादाला (Religious Extremism) थेट लक्ष्य केले जात आहे. आंदोलक तरुण रस्त्यावर उतरून धार्मिक निर्बंधांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. "आम्हाला भाकरीही हवी आणि स्वातंत्र्यही," अशा घोषणांनी इराणची शहरे दुमदुमून गेली आहेत

इराणच्या चलनाची ऐतिहासिक घसरण

इराणचे चलन असलेल्या 'रियाल'मध्ये विक्रमी घसरण झाली असून, एक अमेरिकन डॉलर आता चक्क १४ लाख रियालवर पोहोचला आहे. या चलनफुगवट्यामुळे इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, यामुळे जनतेचा संयम सुटला आहे. महागाईने गाठलेला उच्चांक, वाढती बेरोजगारी आणि नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर लादलेले कडक धार्मिक नियम, या त्रिगुणी संकटामुळे इराणची जनता रस्त्यावर उतरली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून लोकांचा आवाज दाबण्याचे जेवढे प्रयत्न होत आहेत, तेवढ्याच तीव्रतेने आंदोलनाचा भडका उडत आहे. आता हे हिंसेचे लोण संपूर्ण देशात पसरले असून, सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या वर्चस्वाला हे सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी प्रथमच मवाळ भूमिका घेतली आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक स्थितीत असल्याचे मान्य केले असून, आंदोलकांशी संवाद साधण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, केवळ चर्चेने लोकांचा संताप शांत होईल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर हे आंदोलन लवकर शमले नाही, तर इराणच्या सत्ताकेंद्रात मोठे फेरबदल होऊ शकतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >