नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. विमानसेवेचा लाभ घेणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी विमानतळ प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. विमानतळ परिसरात आता अधिकृतपणे 'प्रीपेड टॅक्सी' आणि 'प्रीपेड ऑटोरिक्षा' सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर अनेकदा रिक्षा किंवा टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. भाड्यावरून होणारे वाद आणि वाढीव दराची मागणी यामुळे प्रवासी त्रस्त होते. मात्र, आता प्रशासनाने 'प्रीपेड' (Prepaid) सिस्टिम सुरू केल्यामुळे प्रवाशांना निश्चित आणि पारदर्शक भाडे द्यावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांची फसवणूक थांबण्यास मोठी मदत होणार आहे.
मुंबई : निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष शर्थीचे प्रयत्न करत असतानाच, मुंबईत ठाकरे बंधूंना (उद्धव ठाकरे ...
प्रशासनाने या सेवेसाठी नवीन आणि सुधारित भाडेपत्रक जाहीर केले आहे. हे दर अंतराप्रमाणे (Distance-based) निश्चित करण्यात आले असून, प्रवाशांना प्रवासापूर्वीच किती भाडे द्यावे लागेल याची स्पष्ट कल्पना असेल. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना आता वाहन मिळवण्यासाठी ताटकळत उभे राहण्याची गरज उरणार नाही. ही प्रीपेड सेवा दिवस-रात्र म्हणजेच २४ तास उपलब्ध असणार आहे. रात्री-अपरात्री येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
नवी मुंबई विमानतळावर 'प्रीपेड काउंटर' सज्ज
विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आता इकडे-तिकडे भटकण्याची गरज नाही. विमानतळ परिसरातील अधिकृत प्रीपेड काउंटरवरून प्रवासी थेट तिकीट बुक करू शकतील. देशातील इतर मोठ्या विमानतळांच्या धर्तीवर ही सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे भाड्यावरून होणारे वाद मिटणार आहेत. विशेष म्हणजे, प्रवाशांना आता आगाऊ बुकिंग (Advance Booking) करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवी मुंबई विमानतळावरून २५ डिसेंबर पासून अधिकृतपणे हवाई वाहतुकीला सुरुवात झाली आहे. सध्याच्या काळात येथून प्रामुख्याने दिल्ली, जयपूर, गोवा आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांसाठी उड्डाणे होत आहेत. नवी मुंबई विमानतळ शहरापासून काहीसे दूर असल्याने प्रवाशांना सुरक्षित आणि किफायतशीर वाहतूक मिळणे गरजेचे होते, ही गरज आता प्रीपेड सेवेमुळे पूर्ण होणार आहे. सध्या मर्यादित शहरांसाठी उड्डाणे होत असली तरी, येत्या काळात विमानांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. वाढती प्रवासी संख्या आणि भविष्यातील रहदारी लक्षात घेऊनच ही प्रीपेड टॅक्सी आणि रिक्षा सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे परदेशी पर्यटकांमध्येही सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत होईल.






