Friday, January 2, 2026

कोणतीही चूक, निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन करणार नाही महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांचा इशारा

कोणतीही चूक, निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन करणार नाही महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आचारसंहितेच्‍या कालावधीत प्रत्येक कृतीची नियमांनुसार अचूक व वेळेत नोंद घेणे बंधनकारक आहे. शिस्त, शांतता व निष्पक्षता या निवडणूक प्रक्रियेच्या मूलभूत बाबी असून त्यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कोणतीही चूक, निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही, असा सक्‍त इशारा महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिला आहे. निवडणूक कायदे व मार्गदर्शक सूचनांची प्रत्येक टप्प्यावर काटेकोर अंमलबजावणी करावी. या निर्देशांचे पालन केल्यास नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असेही गगराणी यांनी नमूद केले.

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मुख्य संनियंत्रण समितीची शुक्रवार २ जानेवारी २०२६ रोजी बैठक घेतली. महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीत निवडणूकपूर्व तयारी, कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन, विविध भरारी पथकांचे कार्य, तसेच संशयास्पद व मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले.

मुंबई महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्‍यवस्‍था) सत्‍यनारायण चौधरी, महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (कोकण विभाग) फरोग मुकादम, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्‍लाळे यांच्‍यासह भारतीय रिझर्व्‍ह बँक, अग्रणी जिल्हा बँक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, रेल्‍वे सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल, राज्‍य वस्‍तू व सेवा कर विभागासह इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ पूर्णतः निर्भय, मुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणा कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने सर्वंकष व व्यापक तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत विविध यंत्रणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. लोकशाही मूल्यांचे संवर्धन व्हावे, तसेच निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व विश्वासार्ह राहावी यासाठी सर्व केंद्रीय व राज्य यंत्रणांनी माननीय राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे आणि महानगरपालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. निवडणूक प्रक्रियेत सकारात्मक, आदर्श व अनुकरणीय उदाहरण निर्माण करण्यासाठी सुनियोजित समन्वय साधावा, असे आवाहन गगराणी यांनी केले.

सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्‍यवस्‍था) सत्‍यनारायण चौधरी म्‍हणाले की, महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागनिहाय स्थापन केलेल्या भरारी पथकांसाठी आवश्यक तो पोलीस कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्याच्या जागा व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आवश्यक बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची वाहतूक करताना पोलिस बंदोबस्‍त पुरविण्‍यात येणार आहे. निवडणुकीसाठी पोलीस विभागाने करावयाच्या कार्यवाहीचा संभाव्य आराखडा तयार करण्‍यात आला आहे.

शस्त्र जप्तीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मुंबई पोलीस विभागामार्फत सर्व शस्त्रधारकांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलीस ठाण्‍याच्‍या अहवालाच्या अनुषंगाने शस्त्र जप्ती करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय योजना व तडीपारीच्या आवश्यक प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्‍यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्‍यक कार्यवाहीचे निर्देश उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त, पोलिस निरीक्षक यांना दिले आहेत. समाज माध्‍यमांवर स्‍वतंत्रपणे देखरेख ठेवण्‍यात येत आहे. पोलिसांच्‍या सायबर सेलकडे त्‍याबाबत जबाबदारी सोपविण्‍यात आल्‍याचे चौधरी यांनी नमूद केले.

विमान तळ, रेल्वे स्‍थानके येथे अवैध पैशाची ने-आण होत असेल तर त्याबाबतीत नियमित पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. संशयास्पद व मोठ्या रकमेच्या व्यवहारांची माहिती प्रचलित पद्धतीनुसार आयकर विभागाकडे देण्याची कार्यवाही करावी. मोठे व संशयास्पद पैसे काढणे व गिफ्ट कार्डसच्या बाबतची माहितीही तत्काळ आयकर विभागाला कळवावी, असेही निर्देश या बैठकीत देण्‍यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >