भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या पाचवर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची युती जिंकली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर यांच्या पाठोपाठ आणखी दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पॅनल क्रमांक २७ 'अ' मधून मंदा पाटील आणि पॅनल क्रमांक २४ 'ब' मधून ज्योती पाटील असे या बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या महिला उमेदवारांचे नाव आहे.
मंदा पाटील आणि ज्योती पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता ५ वर पोहोचली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यात माघार घेतल्याने बिनविरोध निकाल लागले. महायुतीने या प्रभागावर संपूर्ण पकड मिळवली आहे.
शिवसेना पक्षानेदेखील मतदानापूर्वीच खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी हे शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक २८ मधून शिवसेनेचे उमेदवार हर्षल राजेश मोरे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी तिन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे. महायुतीचा महापौर बसणार, आणि त्यामध्ये शिवसेनेची नगरसेवक संख्या लक्षणीय असेल, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या एक-दोन दिवसांत आणखी काही प्रभागांमध्येही शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर होताच कार्यकर्ते उत्साही आहेत. हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता आणखीन काही प्रभागात आपले खाते बिनविरोध उघडण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) तयार आहे.






