उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत ५० टक्के आरक्षण
मर्यादेतील जिल्हा परिषदांचा पहिल्या टप्प्यात समावेश
मुंबई : राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते, असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या आत येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रथम घेण्यात येतील, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्ह्यांतील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
३२ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत आहे. या १२ जिल्हा परिषदांमध्ये लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.
२० जिल्हा परिषदांनी आरक्षण मर्यादा ओलांडली
२० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५१ ते १०० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अहिल्यानगर, जालना व बीड यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील निवडणुका लगेच घेणे शक्य नसल्याने दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा विचार सुरू आहे. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदांसाठीच्या निवडणुकांचे भवितव्य न्यायालयीन निकालावर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबतच्या याचिकांवर २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे.






