उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
आमदार शरद सोनावणे आणि युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्याहस्ते या कुटुंबांना मदत सुपूर्द
पुणे (पिंपरखेड) : - शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रोहन बोंबे, शिवन्या बोंबे व भागुबाई जाधव यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. आज आमदार शरद सोनवणे व युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पीडित कुटुंबीयांना ही मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून ही घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली.
नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या तीन घटनांमध्ये पिंपरखेड गावातील रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव अशा तीन जणांचा मृत्यू झाला होता. बिबट्या नरभक्षक झाल्याने गावात सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेरीस वन विभागाने या बिबट्याला ठार करून पिंपरखेड वासियांची या भीतीच्या सावटातून मुक्तता केली. मात्र त्यानंतर या घटनेची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच बिबट्यांच्या त्रासातून कायमस्वरूपी सुटका केली जाईल असे सांगून या ग्रामस्थांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे.
आज ही मदत सुपूर्त केल्यानंतर या तिन्ही पीडितांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच या घटनेनंतर केलेल्या आंदोलनामुळे ग्रामस्थांवर दखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करू असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले. झालेली घटना अत्यंत दुर्देवी असून गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नसली तरीही शिवसेना मात्र कायम आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे बोलताना या ग्रामस्थांना सांगितले.
यावेळी युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे,पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, निरगुडसरचे सरपंच रविंद्र वळसे पाटील, वैभव पोखरकर, युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत, श्रीकांत लोखंडे, किरण ढोबळे, माजी सरपंच नरेश ढोमे, उपसरपंच विकास वरे, कैलास बोंबे, सोपान गावशेते, लक्ष्मण गायकवाड, माऊली ढोमे यांच्यासह शिरूर व आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच पिंपरखेडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






