मुंबई : मोबाईल नेटवर्क नसले तरी आता कॉल आणि मेसेज करता येणार आहेत. होय तुम्ही बरोबर वाचताय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी सुविधा सुरू केली आहे. १ जानेवारी २०२६ पासून BSNL ने देशभरात Voice over Wi-Fi म्हणजेच VoWiFi सेवा सुरू केली असून, यामुळे नेटवर्क नसलेल्या भागातही संपर्क साधणे शक्य होणार आहे.
BSNL VoWiFi सेवेच्या माध्यमातून ग्राहक कोणत्याही उपलब्ध Wi-Fi नेटवर्कचा वापर करून थेट कॉल करू शकतात तसेच मेसेज पाठवू आणि प्राप्तही करू शकतात. घरे, कार्यालये, तळघर, डोंगराळ किंवा दुर्गम भागात जिथे मोबाईल नेटवर्क कमकुवत असते, तिथे ही सेवा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
दूरसंचार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा देशातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये BSNL च्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, VoWiFi मुळे कठीण आणि नेटवर्कअभावी त्रस्त भागातही दर्जेदार आणि अखंड कॉलिंगचा अनुभव मिळणार आहे.
ही सेवा इंटरनेट प्रोटोकॉल मल्टिमीडिया सबसिस्टम म्हणजेच IMS प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यामुळे Wi-Fi आणि मोबाईल नेटवर्कमध्ये आपोआप आणि सहज स्विच होण्याची सुविधा मिळते. महत्त्वाचं म्हणजे, VoWiFi वापरताना ग्राहकांना स्वतंत्र अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. युजर्स आपल्या सध्याच्या मोबाईल नंबरवरून आणि फोनमधील डायलर अॅप वापरूनच कॉल करू शकतील.
ग्रामीण आणि वंचित भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. केवळ स्थिर आणि चांगलं Wi-Fi कनेक्शन असलं की कॉलिंग शक्य होणार आहे. यामुळे मोबाईल नेटवर्कवरील ताणही कमी होईल. विशेष म्हणजे, या सेवेसाठी BSNL कडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
VoWiFi सेवा सुरू करण्यासाठी युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘Wi-Fi Calling’ हा पर्याय ऑन करावा लागेल. ही सुविधा बहुतेक नवीन स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. BSNL सध्या आपल्या 4G नेटवर्कच्या विस्तारावर काम करत असून, लवकरच 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. VoWiFi सेवा ही त्याच दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.






