मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या विषयांसोबतच स्वतःच्या संघर्षातून घडलेले नवे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण करत आहेत. याच यादीत आता शेखर रणखांबे या नावाची भर पडली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाच्या टीझरने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शेखर रणखांबे यांनी केलं असून हा त्यांचा पहिलाच फीचर फिल्म आहे.
मुंबईत संघर्ष करत शेखर यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. उदरनिर्वाहासाठी सुरुवातीच्या काळात त्यांनी प्लंबिंगसारखी कामं केली. मात्र, सिनेमा करण्याचं स्वप्न त्यांनी कधीही सोडलं नाही. पुढे रंगभूमीशी त्यांचा संबंध आला आणि नाटकांच्या बॅकस्टेजवर काम करताना त्यांनी शिस्त, मेहनत आणि टीमवर्कचं महत्त्व जवळून अनुभवलं. याच काळात लेखन आणि दिग्दर्शनाची आवड अधिक घट्ट होत गेली.
यानंतर शेखर यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. ‘रेखा’ आणि ‘पॅम्पलेट’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले लघुपट विविध चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाले असून, त्यांना पुरस्कारांचाही सन्मान मिळाला आहे. या अनुभवाच्या जोरावर अखेर ‘रुबाब’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे.
‘रुबाब’ ही ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित प्रेमकहाणी असली तरी तिची मांडणी पारंपरिक चौकटीपलीकडे जाणारी आहे. या चित्रपटात केवळ प्रेमकथा नाही, तर प्रेम जपताना येणारा स्वाभिमान, ठामपणा आणि आत्मविश्वास यांवर विशेष भर देण्यात आला आहे. संभाजी ससाणे आणि शीतल पाटील हे कलाकार चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. संजय झणकर आणि गौरी झणकर हे या चित्रपटाचे निर्माते असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपट सादर केला आहे. पुढील महिन्यात ‘रुबाब’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, शेखर रणखांबे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, ‘रुबाब’ हा माझा पहिला चित्रपट असल्याने तो माझ्यासाठी अत्यंत खास आहे. झी स्टुडिओज आणि निर्माता संजय झणकर यांनी मला योग्य दिशा आणि व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. कलाकारांनीही प्रामाणिकपणे काम करून कथेला न्याय दिला आहे. टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहून उत्साह वाढला असून, प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.