मोहित सोमण: आज बीएसई व एनएसईवर बँक निर्देशांकाने रॅली दर्शविल्यानंतर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज वाढी आहे. सेन्सेक्स ५७३.४१ अंकाने उसळत ८५७६२.०१ व निफ्टी १८२ अंकांने उसळत २६३२८.५५ पातळीवर स्थिरावला आहे. आज बँक निर्देशांकात मजबूत वाढ झाल्याने शेअर बाजाराने मोठी उडी मारली आहे. निफ्टीने तर २६३२८.५५ पातळीवर नवा उच्चांक (All time High) प्रस्थापित करून सेन्सेक्स दिवसभरात ८५८१२.२७ या नव्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत अनुक्रमे ५७३.५० अंकाने व ४३९.३० अंकांने वाढ झाली आहे. दिवसभरात बँक निफ्टीने तर ६०२०३.७५ व सेन्सेक्स बँक निर्देशांकाने ६७५६१.३७ पातळीवर नवा उच्चांक गाठला आहे. बँक निफ्टीतील आकडेवारी पाहिल्यास कोटक बँक व अँक्सिस बँकेचा अपवाद वगळता इतर ११ बँकेच्या समभागात (Stocks) आज वाढ झाली. सर्वाधिक वाढ येस बँक (३.८२%), युनियन बँक (२.२३%), एसबीआय (२.१२%), बँक ऑफ बडोदा (१.६८%), आयसीआयसीआय बँक (१.२८%), एचडीएफसी बँक (०.९२%) समभागात झाली आहे. आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ पीएसयु बँक, मेटल, ऑटो, कंज्यूमर ड्युरेबल्स, फायनांशियल सर्विसेस २५/५० या निर्देशांकात झाली असून एफएमसीजी शेअर्समध्ये झाली आहे.
युएस बाजारातील संमिश्रता कायम असली तरी युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल हा आशावाद कायम राहिला असताना भारतीय बाजार आगामी तिसऱ्या तिमाहीतचे निकाल वाढलेले कॉर्पोरेट अर्निंगचा गुंतवणूकदारांना आशावाद, कमोडिटीतील तेजी, सकाळी रुपयातील किरकोळ वाढ, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढल्याच्या तुलनेत भारतीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बँकिंग,ऑटो, आयटी, कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये वाढवलेली खरेदी, आणि मुख्यतः बाजारातील सकारात्मकता यामुळे आज शेअर बाजारातील वाढ अधोरेखित झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एसव्हीजेन (११.११%), आयडीबीआय बँक (१०.५७%), टीआरआयएल (९.२६%), ओला इलेक्ट्रिक (८.९८%), कोल इंडिया (६.८५%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण रेडिको खैतान (४.९१%), सफायर फूडस (४.०७%), आयटीसी (३.७९%), वारी एनर्जीज (३.०१%), सीपीसीएल (२.२९%), जीई व्हर्नोवा (२.२४%), इ क्लर्क सर्विसेस (२.०८%) निर्देशांकात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजारांनी सत्राची सुरुवात मजबूत पातळीवर केल्यानंतर, त्यात आणखी वाढ होऊन सत्राचा शेवट दमदार पातळीवर केला. निफ्टी २६१५५ अंकांवर उघडला, सुरुवातीच्या काही मिनिटांत तो २६११८ पातळीच्या नीचांकी पातळीवर घसरला, आणि त्यानंतर त्यात सातत्याने खरेदीचा ओघ दिसून आला, ज्यामुळे तो २६३१४ पातळीच्या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला. हा निर्देशांक दिवसभराच्या उच्चांकाजवळ व्यवहार करत होता, जे संपूर्ण सत्रादरम्यान सकारात्मक गती दर्शवते. बाजाराची स्थिती सकारात्मक राहिली, निफ्टीमधील ३८ शेअर्समध्ये वाढ झाली, १२ शेअर्स घसरले आणि १ शेअर स्थिर राहिला. दिवसाचे मुख्य आकर्षण बँक निफ्टी होता, जो बँकिंग क्षेत्रातील सातत्यपूर्ण मजबुतीमुळे ६०१५२.३५ पातळीच्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.
क्षेत्रीय पातळीवर, ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या विक्रीच्या उत्साहवर्धक आकडेवारीमुळे या क्षेत्राला गती मिळाली. याउलट, एफएमसीजी क्षेत्र दबावाखाली राहिले, आयटीसीचा शेअर जवळपास ४% घसरला, ज्यामुळे संपूर्ण एफएमसीजी क्षेत्राच्या कामगिरीवर परिणाम झाला. दरम्यान, आजच्या सत्रात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९० च्या पातळीच्या पुढे कमकुवत झाला. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, WAAREE ENERY, BOSCH LTD, SWIGGY, ITC, BAJAJ HOLDINGS सारख्या शेअर्समध्ये ओपन इंटरेस्टमध्ये मोठी वाढ दिसून आली, जी वाढलेली ट्रेडिंग क्रिया दर्शवते. ऑप्शन्स मार्केटमध्ये, सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट २६३०० आणि २६५०० स्ट्राइकवर दिसून आला, तर महत्त्वपूर्ण पुट ओपन इंटरेस्ट २६२०० आणि २६३०० वर केंद्रित होता. पुट-कॉल रेशो (PCR) १.७९ च्या उच्च पातळीवर होता. एकूणच, बँकिंग क्षेत्रातील मजबुती आणि बाजाराच्या सकारात्मक स्थितीमुळे व्यापक भावना सकारात्मक राहिली.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' नवीन वर्षाच्या सुट्ट्यांनंतर, जागतिक बाजारांनी २०२६ ची सुरुवात सकारात्मकतेने केली, तर देशांतर्गत वाहन विक्रीतील जोरदार वाढीमुळे भारतीय समभागांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला. गुंतवणूकदारांची भावना एकूणच सकारात्मक आहे, कारण आता लक्ष तिसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या निकालांवर केंद्रित झाले आहे, जे नजीकच्या काळातील बाजाराची दिशा ठरवतील अशी अपेक्षा आहे. सहाय्यक राजकोषीय धोरणे आणि टप्प्याटप्प्याने होणारी मौद्रिक शिथिलता २०२६ मध्ये गुंतवणुकीच्या परिस्थितीला आकार देण्याची शक्यता आहे. तथापि, गुंतवणूकदार स्थिरतेसाठी लार्जकॅप शेअर्सवर लक्ष केंद्रित करत आहेत, तर चक्रीय क्षेत्रांमध्ये आणि देशांतर्गत वाढीवर आधारित क्षेत्रांमध्ये निवडकपणे मिड-कॅप संधी शोधत आहेत.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'डॉलर निर्देशांकाने ९८.५० च्या आसपास किंचित मजबूती दर्शवल्यामुळे, रुपया डॉलरच्या तुलनेत ९०.१६ च्या पातळीवर ०.२० रुपयांनी म्हणजेच ०.२२% ने कमजोर झाला. वस्तूंच्या किमतींमधील चढउतार, विशेषतः सोने, चांदी आणि धातूंच्या किमती, हे चलनावर परिणाम करणारे एक महत्त्वाचे घटक आहेत. बाजारातील सहभागी पुढील आठवड्यात नवीन संकेतांसाठी अमेरिकेचा एडीपी रोजगार, बिगरशेती वेतनपट आणि बेरोजगारीच्या आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवतील. नवीन वर्षात भारत-अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार घडामोडींबाबतचा आशावाद रुपयाला आधार देऊ शकतो, तर नजीकच्या काळात रुपया ८९.७०-९०.५५ रूपयांच्या श्रेणीत व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे.'
नजीकच्या काळात गुंतवणूकदारांसाठी कुठली निफ्टी स्ट्रेटेजी?
१) एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे -
निर्देशांकाने त्याच्या मागील स्विंग उच्चांक ओलांडला आहे, ज्यामुळे सकारात्मक ट्रेंडच्या दिशेला बळकटी मिळाली आहे. २० ईएमए आणि ५० ईएमएचा (Exponential Moving Average EMA) तेजीचा क्रॉसओवर चढत्या रचनेला आणखी मजबूत करतो. याव्यतिरिक्त, दैनंदिन आरएसआयने त्याच्या मागील एकत्रीकरण (Consolidation) टप्प्यातून बाहेर पडून गतीमध्ये वाढ झाल्याचे संकेत दिले आहेत. नजीकच्या ते अल्प मुदतीत ट्रेंड मजबूत राहण्याची अपेक्षा आहे आणि जोपर्यंत निर्देशांक २६००० पातळीच्या वर टिकून राहतो, तोपर्यंत घसरणीच्या वेळी खरेदी करण्याचा दृष्टिकोन तेजीवाल्यांच्या बाजूने राहील. वरच्या बाजूने (Upside) २६३५० पातळीच्या वरची निर्णायक चाल अल्प मुदतीत २६६०० पातळीच्या दिशेने वाटचाल करण्याचा मार्ग मोकळा करू शकते.'
२) एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक रिसर्च विश्लेषक नागराज शेट्टी-
शुक्रवारी निफ्टीमध्ये जोरदार ब्रेकआउट दिसून आला आणि त्याने सुमारे २६२००-२६३०० पातळीच्या महत्त्वाच्या अडथळ्यांना पार करत २६३४० पातळीच्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर झेप घेतली. सकारात्मक सुरुवातीनंतर, बाजाराने सत्राच्या सुरुवातीच्या ते मधल्या भागात आपली तेजी कायम ठेवली. सत्राच्या शेवटी थोडी घसरण दिसून आली, परंतु त्यानंतर निफ्टीने पुन्हा उसळी घेतली आणि उच्चांकावर बंद झाला.
दैनंदिन आलेखावर (Daily Chart) मध्ये एक लांब तेजीची कँडल तयार झाली आहे जी अलीकडील एकत्रीकरण हालचालीतून निर्णायक ब्रेकआउट दर्शवते. ही एक सकारात्मक घडामोड आहे आणि अल्पावधीसाठी ही तेजीची गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. निफ्टीचा मूळ कल तीव्रतेने तेजीचा आहे. पुढील १-२ आठवड्यांसाठी पाहण्यासारखे पुढील तेजीचे लक्ष्य सुमारे २६७५० आहे (६१.८% फिबोनाची विस्तार- एप्रिलच्या नीचांकी, जूनच्या उच्चांकी आणि ऑगस्टच्या नीचांकी पातळीवरून घेतलेले) तात्काळ आधार (Immediate Support) २६२०० वर आहे.






