विवाह पद्धतीतील वळणे

मीनाक्षी जगदाळे


विवाहाचा प्रकार कोणताही असो, यशस्वी वैवाहिक जीवन केवळ परस्पर आदर, विश्वास, संवाद आणि एकमेकांना समजून घेण्यावर अवलंबून असते. काळानुसार विवाह पद्धतीत बदल झाले असले तरी, दोन व्यक्तींनी एकत्र येऊन कुटुंब व्यवस्था पुढे चालवण्याचा मूळ उद्देश आजही कायम आहे.


प्रेम विवाह (पळून जाऊन/नोंदणी पद्धत)चे फायदे लक्षात घेतल्यास यात पूर्ण स्वातंत्र्य मिळते, स्वतःच्या पसंतीचा जोडीदार निवडता येतो आणि वैयक्तिक आनंदाला प्राधान्य मिळते. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्यास एकमेकांना पूर्ण ओळखलेले असते, एकमेकांना खूप वेळ समजून घ्यायला मिळालेला असतो. स्वभाव, गुण, दोष पूर्ण माहिती असते त्यामुळे वैवाहिक आयुष्य यशस्वी व्हायला मदत होते. तरीही आजमितीला आपण बघतोय की प्रेम विवाह पण तुटण्याचे प्रमाण मोठे आहे. प्रेम विवाहबद्दल तोटे सांगायचे झाल्यास कुटुंबाचा/समाजाचा तीव्र विरोध असतो, भावनिक आधार गमावणे तसेच काही कायदेशीर अडचणी येणे तसेच सामाजिक एकाकीपणा येऊ शकतो. अशा विवाहात कोणतीही समस्या आल्यास त्यावर उत्तर शोधायला जबाबदार व्यक्ती उपलब्ध नसते, हे विवाह अयशस्वी झाल्यास दुःख, नैराश्य, पच्छाताप पदरात पडतो, माघारी परतण्याचे रस्ते पण बंद झालेले असतात. लव्ह-कम-अरेंज मॅरेजचे फायदे पहिल्यास लक्षात येते की, प्रेम आणि कौटुंबिक आशीर्वादाचा समन्वय साधला जातो, कुटुंबाचा पाठिंबा मिळतो आणि सामाजिक स्वीकृती मिळते. मुलाला अथवा मुलीला कलंक लागत नाही, जोखीम कमी होते तसेच आयुष्यभरासाठी कुटुंबाची, इतर नात्यांची ताटातूट होत नाही. या लग्नाचे तोटे बघितल्यास यात कुटुंबाला मनवण्यासाठी वेळ आणि प्रयत्न खूप करावे लागतात तसेच दोन्ही कुटुंबांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा ताण येतो. दोन्ही मधील एका जरी कुटुंबाने परवानगी नाकारली तरी, अथवा खूप विरोध केला तर प्रेमाचा त्याग करायची तयारी ठेवावी लागते.


नोंदणी करून लपवणे ही विवाह पद्धत त्वरित कायदेशीर मान्यता लग्नाला मिळवून देते. कोणाला सांगणं, विचारणं, चर्चा, विरोध, टीका अथवा संघर्षाचा ताण कमी होतो. यातील तोटे पण मोठ्या प्रमाणात जाणवतात. लग्न लपवण्याचा ताण सतत असतो. लग्नासारखी गोष्ट जास्त काळ लपून राहत नाही. छोटा कार्यक्रम करू तेव्हा सांगू असा निर्णय घेतला तरी त्या वेळी नातेवाईक किती दुखावलेले असतील, ते कार्यक्रमात सहभागी होतील का? नातेवाईक कायमचे तुटतील का? याचा तणाव सातत्याने मनावर राहतो. लग्न होऊन ते जाहीर होईपर्यंत अनेकांना ते कुठून न कुठून कळते त्यामुळे नात्यात अविश्वास वाढतो. या सर्व लग्न पद्धतीचे पती-पत्नी आणि कुटुंबावर होणारे परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे. पारंपरिक ठरवून केलेले लग्न असल्यास पती-पत्नीवर सुरुवातीला जुळवून घेण्याचा ताण असतो, पण कालांतराने नात्यात स्थिरता आणि सुरक्षितता येते. अशा लग्नाचा कुटुंबावर सकारात्मक परिणाम होतो. कुटुंबाचे मोठे जाळे तयार होते, मुलांचे भविष्य सुरक्षित होते आणि दोन्ही कुटुंबांचे संबंध दृढ होतात. दोन्हींकडील मंडळींची एकमेकांना सातत्याने मदत, आधार, सहकार्य होऊ शकते. जन्माला आलेल्या नवीन आपत्याला दोन्हींकडील प्रेम, सहवास लाभतो. प्रेमविवाह (पळून जाऊन/नोंदणी पद्धत) याचा पती-पत्नीवर परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने होतो. एकमेकांवर अधिक अवलंबून राहणे, तिसरं कोणीही काहीच सांगायला, समजवायला नसणे त्यामुळे या जोड्या असुरक्षित वातावरण असल्याने त्यांच्यात मानसिक ताण आणि भावनिक चढ-उतार सतत होत राहतात. जोडीदाराशी बिनसलं तर खूप एकाकी पनाची भावना निर्माण होते. या लग्नाचे कुटुंबावर होणारे परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील संबंध तुटतात किंवा ताणले जातात, कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येते, अनेकदा एकमेकांच्या जीवावर उठणे, टोकाची भांडणे, वाद, धमक्या देणे, पोलीस कंप्लेंट, मारामाऱ्या यांसारख्या घटना घडू शकतात. अनेकदा अश्या लग्नात दीर्घकाळानंतर तणाव कमी होऊ शकतो.


नोंदणी करून लपवणे या प्रकारात पती-पत्नीवर सततचे दडपण आणि गुपित उघड होण्याची भीती असते, ज्यामुळे प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. अनेक जवळची लोकं कायमस्वरूपी दुखावली जातात, नात्यात दुरावे तयार होतात आणि उलट-सुलट चर्चा, अफवा, गैरसमज याला खतपाणी घातले जाते. प्रत्येक जण अशा लग्नाचा स्वतःच्या सोयीने, स्वतःच्या दृष्टिकोनातून वेगवेगळा अर्थ काढतो. अशा लग्नाचा कुटुंबावर परिणाम पाहिला असता कुटुंबात अविश्वास आणि गैरसमज वाढतो. ही गोष्ट उशिरा जाहीर केल्यास समाजातून, नात्यातून तीव्र नकारात्मक प्रतिक्रिया येण्याची शक्यता असते. वधू-वरांचा प्रामाणिकपणा, पारदर्शी पणा यावर प्रश्न चिन्ह निर्माण होते. आताच हे असे वागले तर पुढे यांच्याकडून काय अपेक्षा करायची असा विचार केला जावू शकतो. आधुनिक विवाह व्यवस्था अनेक प्रकारची लवचिकता घेऊन आली आहे. तरुण पिढी आता "माझे वैयक्तिक स्वातंत्र्य विरुद्ध कुटुंबाची इच्छा" या द्विधा मनस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. जुन्या पिढीसाठी कौटुंबिक आणि सामाजिक सुरक्षा महत्त्वाची होती, तर नवीन पिढीसाठी वैयक्तिक आनंद आणि भावनिक जुळणारे संबंध अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. विवाहाचा प्रकार कोणताही असो, यशस्वी वैवाहिक जीवन केवळ परस्पर आदर, विश्वास, संवाद आणि एकमेकांना समजून घेण्यावर अवलंबून असते. काळानुसार विवाह पद्धतीत बदल झाले असले तरी, दोन व्यक्तींनी एकत्र येऊन कुटुंब व्यवस्था पुढे चालवण्याचा मूळ उद्देश आजही कायम आहे. आपण आंतरजातीय विवाह किंवा विवाह समुपदेशन यांसारख्या विषयांवर लग्नाआधी व्यवस्थित मार्गदर्शन घेणे, खासगी डिटेक्टिव्ह एजेन्सीमार्फत भावी वधू-वराची सखोल माहिती जाणून घेणे यावर भर दिल्यास आपले वैवाहिक आयुष्य निश्चित सुखी, समाधानी होण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

जुन्या-नव्याच्या वादात वाढले बंडखोर

वार्तापत्र मराठवाडा : डॉ . अभयकुमार दांडगे पालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष

भविष्यवेत्त्यांच्या नजरेतून २०२६

पंकजा देव भविष्यामध्ये काय घडेल याचे कुतूहल, भीती, चिंता आणि भय प्रत्येकाला असते. त्यामुळेच भविष्याची काळजी

नाशिकमध्ये रंगणार तिरंगी लढत

धनंजय बोडके गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वाधिक प्रस्थ असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आहे. नुकत्याच झालेल्या

मागे वळून पाहताना...

कर्नल (नि.) अनिल आठल्ये (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक) काळ सरकला ; पण त्या काळाने जाता जाता आपल्या पदरात काय

फळे रसाळ गोमटी!

चंद्रशेखर चितळे (ज्येष्ठ लेखापाल) अर्थविश्वाच्या संदर्भात सरत्या वर्षाचा मागोवा घेताना अनेक विषयांना स्पर्श

महिलांविषयक सुधारणांत अजूनही अडथळेच !

रंजना गवांदे (विधिग्ज्ञ) बदलत्या काळासरशी महिलाविषयक प्रश्नांचे स्वरूप आणि गांभीर्यही बदलत आहे. हे प्रश्न