आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात
ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला आणि उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. यानंतर दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील प्रभाग क्रमांक १७ मधून शिंदे गटाचे उमेदवार मनोज शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या उबाठाच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला.
सही नसणे आणि बँक स्टेटमेंट न सादर केल्याचे कारण देत अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचे संबंधित उमेदवाराने सांगितले. तसेच, छाननीवेळी नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. “अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे दहा मिनिटे असताना मला कागदपत्रे आणायला सांगण्यात आले. मी गरीब घरातून आलो असून माझ्यावर अन्याय झाला,” असा आरोप उमेदवाराने केला. दरम्यान, प्रभाग क्रमांक १८ मधून मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचाही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रे उशिरा असल्याचे कारण देत अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “आम्ही कागदपत्रे वेळेत आणली होती, मात्र पोलिसांनी आत प्रवेश नाकारला. नंतर आत सोडल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून न घेता अर्ज बाद केला,” असे प्राची घाडगे यांनी सांगितले. या प्रकारावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित आरओवर कारवाईची मागणी केली आहे. “फॉर्म डिस्प्ले करण्याची वेळ पाळण्यात आली नाही. जाणून-बुजून आमच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले,” असा आरोप जाधव यांनी केला.
तसेच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकरणात खुलासा करावा आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घडामोडींमुळे ठाणे मनपा निवडणुकीतील वातावरण चांगलेच तापले आहे.






