Friday, January 2, 2026

महाराष्ट्रासह शेअर गुंतवणूकदार वारंवार फसतात याचे मूर्तीमंत उदाहरण! गुजरात राजस्थान येथे ईडीच्या धाडी

महाराष्ट्रासह शेअर गुंतवणूकदार वारंवार फसतात याचे मूर्तीमंत उदाहरण! गुजरात राजस्थान येथे ईडीच्या धाडी

मोहित सोमण: दोन स्वतंत्र प्रकरणात गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने घोटाळ्याप्रकरणी आरोपींच्या जागांवर मनी लॉन्ड्रिंग २००२ कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement Directorate ED) गुजरात व राजस्थान येथे धाडी टाकल्या आहेत. याची माहिती ईडीने प्रसारमाध्यमांना आज स्पष्ट केली. एका प्रकरणात राजस्थान जयपूर येथे ईडीच्या क्षेत्रीय कार्यालयाने जयपूर, किशनगढ अजमेर येथील ७ जागांवर धाडी टाकल्या आहेत. डिजी मुद्रा कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व कंपनीचे संचालक रवी जैन व प्रकाश जैन यांच्यावर खोट्या आकर्षक योजनेत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक प्रकरणी हा गुन्हा ईडीने दाखल केला आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. 'My Victory Club' MVC नामक अँपच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकीतून ग्राहकांची फसवणूक या कंपनीकडून सुरु होती असे ईडीने स्पष्ट केले होते.

महत्वाचे म्हणजे या आलेल्या गुंतवणूकीतून हे पैसे व्यक्तिगत कारणासाठी वळवल्याचा गंभीर ठपका ईडीने आरोपीवर ठेवला आहे. या पैशातून विविध स्थावर मालमत्ता खरेदी केल्यागेल्या असून कुटुंबांसाठी हा पैसा खर्च करण्यात आला असा दावा ईडीने कथित प्रकरणात केला. घटनास्थळी ईडीने साहित्य, काही डिजिटल पुरावे, व ११.३ लाखांची रोकड जप्त केली आहे असे ईडीने म्हटले. तसेच ईडी त्यांच्या इतर बँक खात्यातील ३८ लाखांपेक्षा अधिक रक्कमेवर कारवाई करणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

मेहसाणा गुजरात येथेही फसवणूकीविरोधात ईडीची कारवाई -

दुसऱ्या स्वतंत्र प्रकरणात ईडीने हिमांशू उर्फ पिंटू भावसार या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे स्पष्ट झाले आहे. ईडीच्या अहमदाबाद येथील क्षेत्रीय कार्यालयाने पिंटु भावसार व त्याच्या इतर साथीदारांविरोधात संबंधित घटनास्थळी धाडी टाकल्या. त्या प्रकरणात भावसारकडून २.४० कोटीचे ११० किलो चांदी (बुलियन) व १.७ कोटीचे १.२९६ किलो सोने व ३९.७ किलो वजनाची चांदीची ज्वेलरी ईडीने जप्त केली आहे. मेहसाणा येथील खेरालू पोलिस स्थानकात भावसार व साथीदारांवर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे यावेळी ईडीने स्पष्ट केले. कथित प्रकरणात संबंधित व्यक्ती गुंतवणूकदारांना शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीसाठी आकर्षित करत मोठ्या परताव्यासाठी आश्वासन देत असे. मात्र ईडीने दिलेल्या वृत्तानुसार, ही रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक न करता वैयक्तिक कारणासाठी खर्च केली गेली होती.

ईडीला तपासा दरम्यान, संबंधित प्रकरणात आरोपींवर विविध राज्यांत सहा एफआयआर दाखल झाल्याचे आढळले. वडनगर, विसानगर, मेहसाणा इथे कार्यालय उघडून संबंधित आरोपींनी कार्यालय उघडून कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले होते. या व्यक्तीने कथित प्रकरणात हे कर्मचारी गुंतवणूकदारांना दूरध्वनी करून गुंतवणूकदारांना आकर्षित करत होते असे ईडीने म्हटले. मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत केलेल्या तपासादरम्यान असे समोर आले की, हिमांशू भरतकुमार भावसारने सेबीने जारी केलेले गुंतवणूक सल्लागार प्रमाणपत्र आपल्या वैयक्तिक क्षमतेने विश्वास स्टॉक्स रिसर्च प्रा लि, दलाल स्टॉक्स ॲडव्हायझरी प्रा लि आणि देवकी स्टॉक्स प्रा लि या कंपन्यांच्या नोंदणी नसलेल्या गुंतवणूक सल्लागार कामांसाठी वापरले होते. उपरोक्त तीन कंपन्यांकडे गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्यासाठी सेबीचे कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र नव्हते. सेबीने आपल्या आदेशात, विश्वास स्टॉक्स रिसर्च प्रा.लि दलाल स्टॉक्स ॲडव्हायझरी प्रा लि आणि देवकी स्टॉक्स प्रा लि आणि त्यांचे संचालक म्हणजेच हिमांशू भरतकुमार भावसार (पिंटू) भावसार आणि इतरांना गुंतवणूक सल्लागार सेवा देऊन केलेल्या उल्लंघनांसाठी/नियमांच्या भंगासाठी जबाबदार धरले. या प्रकरणीही ईडीने अधिक सखोल चौकशी सुरू केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >