Friday, January 2, 2026

दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात कामाच्या तासांवरून आणि व्यावसायिक अटींवरून झालेल्या मतभेदांमुळे हा सिनेमा आधीच वादात सापडला होता. संदीप रेड्डी वांगांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनंतर हा वाद अधिकच चिघळला आणि अखेर दीपिकाने चित्रपटातून माघार घेतल्याचं स्पष्ट झालं.

या प्रकरणावर बॉलिवूडमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक कलाकार, निर्माते आणि ज्येष्ठ मंडळींनी यावर आपापली मतं मांडली. काही दिवसांनी दीपिकाच्या जागी अभिनेत्री तृप्ती डिमरीची या सिनेमात एन्ट्री झाल्याचं जाहीर करण्यात आलं. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृप्तीच्या सहभागामुळे ‘स्पिरिट’बाबतचं कुतूहल आणखी वाढलं.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘स्पिरिट’चं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरमध्ये प्रभास आणि तृप्ती डिमरी दिसत असून, दोघांचेही चेहरे पूर्णपणे समोर न आणता चित्रपटाचा गंभीर आणि गडद विषय सूचित करण्यात आला आहे. लांब केस आणि तगडा फिटनेस यामुळे प्रभासचा नवा लूकही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

‘अॅनिमल’ या सुपरहिट चित्रपटानंतर संदीप रेड्डी वांगा पुन्हा एकदा वेगळ्या धाटणीचा विषय घेऊन येत असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘स्पिरिट’मध्ये प्रभास आणि तृप्ती डिमरीसोबत विवेक ओबेरॉय, प्रकाश राज आणि ज्येष्ठ अभिनेत्री कंचना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, दीपिका पादुकोण आणि संदीप रेड्डी वांगा यांच्यातील वादाबाबत आजही तर्कवितर्क सुरू आहेत. दीपिका या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होती. मात्र, कामाचे तास मर्यादित ठेवण्याची अट आणि मानधनात वाढ करण्याच्या मागणीमुळे मतभेद निर्माण झाल्याचं बोललं जातं. या अटी वांगांना मान्य नसल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय, संदीप रेड्डी वांगांनी नाव न घेता सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये संबंधित अभिनेत्रीच्या पीआर टीमवर टीका करत चित्रपटाची स्क्रिप्ट लीक झाल्याचा आरोपही केला होता. या संपूर्ण वादावर दीपिकाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >