Friday, January 2, 2026

जीएसटी संकलनातून सरकारच्या तिजोरीत १.७४ लाख कोटी जमा

जीएसटी संकलनातून सरकारच्या तिजोरीत १.७४ लाख कोटी जमा

दरकपात असूनही डिसेंबरमध्ये मजबूत जीएसटी संकलन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिसेंबर २०२५ मधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. या कालावधीत जीएसटी महसूल वार्षिक आधारावर ६ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये जीएसटी संकलन १.७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये देशाचा जीएसटी महसूल १.६४ लाख कोटी रुपयांहून अधिक होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यात सरकारच्या तिजोरीत लक्षणीय भर पडल्याचे चित्र आहे. डिसेंबर २०२५ मध्ये जीएसटी संकलनात ६.१ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली. जीएसटी दरकपात करण्यात आली असतानाही हा आकडा समाधानकारक आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा महसूल १.२ टक्क्यांनी वाढून १.२२ लाख कोटी रुपये झाला. आयातीत वस्तूंमधून मिळणारा महसूल १९.७ टक्क्यांनी वाढून ५१,९७७ कोटी रुपये झाला. जीएसटी रिफंड ३१ टक्क्यांनी वाढून २८,९८० कोटी रुपये इतका झाला.

जीएसटी दरकपातीचा महसुलावर परिणाम

अहवालानुसार, २२ सप्टेंबर २०२५ पासून सुमारे ३७५ वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले होते. यामुळे दैनंदिन वापरातील जवळपास ९९ टक्के वस्तू स्वस्त झाल्या. कंपेन्सेशन सेस आता केवळ तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांपुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे. याआधी हा सेस लक्झरी आणि ‘सिन प्रॉडक्ट्स’वरही लागू होता. तज्ज्ञांच्या मते, जीएसटी दरकपातीमुळे महसूल संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाला असला, तरीही आयातीतून वाढलेले उत्पन्न आणि स्थिर देशांतर्गत व्यवहार यामुळे संकलन सकारात्मक राहिले आहे.

Comments
Add Comment