Thursday, January 1, 2026

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार म्हणायचं तर या वर्षात दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये रणधुमाळी पाहायला मिळाली. दोन्ही राज्यांमध्ये बाजी मारत भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची भरपाई केली. तर महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने सुद्धा सत्तेतील यशाचे एक वर्ष पूर्ण केलं. आजपासून सुरू झालेल्या वर्षात गेल्यावर्षीपेक्षा जास्त प्रमाणात राजकारण गाजणार आहे. कारण २०२५ मध्ये देशातील ५ प्रमुख राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यांत २०२६ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्याशिवाय विविध राज्यांमधील राज्यसभेच्या ७५ जागांवर एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या निकालांमुळे केवळ नवी राजकीय समीकरणं उदयाला येणार नाहीत तर राजकीय दशा आणि दिशाही बदलेल, असा दावा केला जात आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपत असून एप्रिल-मे दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा असून, तिथे तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये होणारी लढत महत्त्वाची आहे. २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला होता. २०११ पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसला यावेळी मागे सारण्यात आणि राज्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

२०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील दुसरे प्रमुख राज्य आहे तामिळनाडू. तामिनाडूमध्येही एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. येथे डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची कसोटी लागणार आहे. स्टॅलिनसमोर यावेळी डीएमके आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय याचा टीव्हीके पक्ष असे दुहेरी आव्हान असण्याची शक्यता आहे. २०२१ साली झालेल्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत एकूण २३४ जागांपैकी डीएमकेने १३३ जागा जिंकल्या होत्या. तर डीएमकेचा मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षामुळे येथील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

सध्या देशात डाव्या पक्षांच्या ताब्यात असलेलं एकमेव राज्य असलेल्या केरळमध्येही एप्रिल-मे महिन्यादरम्यान निवडणुका होणार आहेत. २०२१ साली झालेल्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीत एलडीएफने ९९ जागा जिंकत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली होती. मात्र तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत विजय मिळवल्यानंतर भाजपसुद्धा सक्रिय झाली आहे.

पूर्वोत्तर भारतातील आसाममधील विधानसभेचा कार्यकाळही संपत आला आहे. त्यामुळे येथेही एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता असून, २०१६ पासून येथे भाजपाने आपले वर्चस्व राखले आहे. तसेच हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत आसाममधील विधानसभेच्या १२६ जागांपैकी ७५ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या आघाडीला ५० जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे यावेळीही भाजप बाजी मारेल अशी चर्चा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >