जैमिनी

डॉ. अनुराधा कुलकर्णी, anuradh.klkrn@gmil.com, भारतीय ऋषी

महर्षी जैमिनींच्या पूर्वमीमांसा सूत्रात १२ अध्याय आहेत. जैमिनींनी यज्ञकर्माचा तपशील इतक्या बारकाईने दिला आहे की तो समजून घेणे अवघड आहे, त्यामुळे अनेक विद्वानांनी त्यावर विस्तृत भाष्ये, विवरणे लिहिली आहेत. पण आजच्या काळात या मीमांसेचा उपयोग काय, असा प्रश्न पडल्यास त्यातील तत्त्वज्ञानाचे महत्त्व आपल्याला समजून घ्यावे लागेल.

यज्ञातील प्रत्येक हवनामागे ‘इदं न मम - हे माझे नाही’ असे वाक्य जोडलेले असते. जीवनातील सारे संघर्ष ‘हे माझे, हे माझे’मुळेच उत्पन्न होतात. खरे तर आपल्या प्रत्येक कर्मात सर्वांचा सहभाग असतो. सकाळी उठल्यावर मुखमार्जनाचे साधे कृत्य, पण त्यासाठी लागणारे पाणी ज्या नळाने येते, त्याचे पाइप बनविणारा कारखाना, त्यात काम करणारे कामगार, तयार पाइपला ज्या ट्रकमधून आणले गेले, त्या ट्रकचा ड्रायव्हर, दुकानदार, प्लंबर... ही यादी संपणारी नाही. त्यातून एकच लक्षात येईल की आपल्या कुठल्याही कर्मात आपल्या एकट्याचा वाटा नसतो, त्यासाठी अनेक अनामिकांचा हातभार लागलेला असतो. शिवाय आपले शरीर, ती तर पंचमहाभुतांची देणगी, त्यातील चैतन्यशक्ती ही ईश्वरीकृपा. म्हणून आपले प्रत्येक कर्म हे यज्ञमय असणे म्हणजे स्वतःसह सर्वांच्या उन्नतीसाठी असणे महत्त्वाचे आहे. “इदं न मम’’ भावनेने केलेल्या समर्पणरूप कर्मांद्वारेच आत्मविकास साधतो.

आपल्या पूर्वमीमांसा सूत्रात महर्षी जैमिनी धर्माची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात, “चोदना लक्षणो अर्थो धर्मः’’ कर्मप्रवृत्त करणाऱ्या वेदांच्या आदेशातून अभिप्रेत असलेला अर्थ हाच धर्म, असे ते म्हणतात. या व्याख्येवरून महर्षी जैमिनींची प्रखर वेदनिष्ठा दिसून येते. कोणती कर्मे करावीत व कोणती करू नयेत, हे वेद वचनांवरून कळते, म्हणून अशा वेदशास्त्राविषयी निष्ठा निर्माण करणे, अधर्माची निवृत्ती करून धर्माची प्रवृती करणे हे उद्दिष्ट महर्षी जैमिनींच्या पूर्व मीमांसेत दिसून येते. मात्र ही सूत्रे समजून घेण्यासाठी वैदिक यज्ञयागाची माहिती असणे आवश्यक आहे. पूर्व मीमांसेत मुख्यतः यज्ञक्रियांचे विवेचन असल्याने त्यास कर्मकांड असे म्हणतात तर उत्तर मीमांसेत आरण्यक व उपनिषदे यांच्यात तत्त्वविवेचन असल्याने त्यास ज्ञानकांड असे म्हणतात. महर्षी वेदव्यासांची ब्रह्मसूत्रे हा उत्तरमीमांसेचा आधारग्रंथ होय. पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही दोन दर्शने मुळात जोडलेलीच होती. मात्र उत्तरमीमांसेत आत्म्याच्या एकमेवाद्वितीयतेचा पुरस्कार केलेला आहे आणि पूर्व मीमांसा आत्म्याचे अनेकत्व मानते. त्या अनेकत्वाचे खंडन ब्रह्मसूत्रात केलेले असल्याने उत्तरमीमांसा हे वेगळे दर्शन समजले गेले.

मार्कंडेयपुराणात महर्षी मार्कंडेय व महर्षी जैमिनी यांचा संवाद आहे. यात जैमिनींनी मार्कंडेय यांना महाभारताविषयी काही शंका विचारल्या. त्या अशा, गुणातीत विष्णूला अवतार का घ्यावा लागला? द्रौपदी पाच पांडवांची पत्नी कशी झाली? बलराम तीर्थयात्रेला का गेले? द्रौपदीचे पुत्र का मारले गेले? या प्रश्नांच्या उत्तरासाठी मार्कंडेय यांनी जैमिनींना विंध्याचलात वास्तव्य करणाऱ्या चार पक्ष्यांकडे जायला सांगितले. दुर्वासांच्या शापाने पक्षीण झालेल्या वपू नावाच्या अप्सरेच्या पोटी हे चार पक्षी जन्माला आले होते. जैमिनी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी जैमिनींच्या प्रश्नांची पुढीलप्रमाणे उत्तरे दिलीत. भगवंतांचे मूळ स्वरूप जरी गुणातीत असले तरी धर्माच्या रक्षणासाठी मायेचा अंगीकार करून तो अवतरतो, इंद्राने वृत्राचा वध केला म्हणून ब्रह्महत्येचे व अहिल्येला फसविले म्हणून जारकर्माचे त्याला पाप लागले. त्यामुळे धर्म, तेज, बल व रूप हे गुण इंद्राला सोडून गेले. त्यांच्यापासून पांडव निर्माण झाले, (रूप गुणापासून नकुल व सहदेव असे दोन) इंद्रपत्नी शची द्रौपदीच्या स्वरूपात आली. पाचही पांडव इंद्रातूनच निर्माण झालेले असल्याने तिने त्या पाचांशी विवाह केला. रोमहर्षणमुनी पुराणकथा सांगत असता बलराम तेथे गेले. त्यांना पाहून सर्व श्रोते उठून उभे राहिले पण रोमहर्षणमुनी आपले गुरू व्यासांशी मनाने एकरूप झालेले असल्याने व्यासपीठावरून उठले नाही, त्याचा राग येऊन बलरामांनी रोमहर्षणांना ठार मारले. पण नंतर बलरामांना स्वकृत्याचा पश्चाताप झाला आणि ते पापक्षालनासाठी तीर्थयात्रेला गेले. विश्वामित्रांच्या शापाने विश्वेदेवांना मनुष्ययोनीत जन्म घ्यावा लागला. ते पाच देव द्रौपदीचे पुत्र झाले. परत देवत्व पावण्यासाठी कुमारवयातच मरण पावले. या कथांमुळे जैमिनींसह आपलेही शंकानिरसन होते म्हणून त्यांचा उल्लेख केला !

महर्षी जैमिनींचे गृह्यसूत्रेही आहेत. त्याचप्रमाणे जैमिनीनिघंटू हा ग्रंथ आहे, यात वेदातील शब्द व धातूंचा संग्रह आहे. म्हणजेच हा वेदशब्दकोश आहे. जैमिनींचे अजुन ग्रंथ म्हणजे जैमिनीपुराण, जैमिनी भागवत, जैमिनीभारत, जैमिनीय उपनिषदब्राह्मण, जैमिनीस्तोत्र, जैमिनीस्मृती, जैमिनी अश्वमेध इ. जैमिनींनी एका विशाल महाभारताची रचना केली होती, असे म्हणतात, पण त्यापैकी जैमिनी अश्वमेध एवढाच भाग आज उपलब्ध आहे. पण हा भागही प्रचंड आहे. यात महाभारत युद्धात पांडव जिंकल्यानंतर त्यांनी जो अश्वमेधयज्ञ केला, त्यावेळी केलेल्या दिग्विजयाचे विस्तृत वर्णन आहे. अशा या ज्ञानक्षेत्रात चौफेर भ्रमंती करणाऱ्या मुनींना सादर प्रणाम. (उत्तरार्ध)
Comments
Add Comment

२०२५ गोंदणखुणांतून २०२६च्या नव्या पहाटेकडे

ऋतुजा केळकर, ऋतुराज ‘ऋतुभारणीच्या गोंदणावर... नव्या वर्षाचा झुलता गुलमोहर... नव्या मोगरी गंधाचा पाझर... देह

प्रपंच आणि परमार्थ

अर्चना सरोदे, मनाचा गाभारा प्रपंच करोनी परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग। तुकाराम महाराज म्हणतात, ज्या

अखिल मानवजातीचे सुख

सद्गुरू वामनराव पै, जीवन संगीत सध्या समाजामध्ये अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. "आपल्या हातात काही

निःस्वार्थ मदत

प्राची परचुरे - वैद्य, आत्मज्ञान माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना आपण ऐकली असेलच. ते गाणं पुन्हा

भाग्यविधाता

सद्गुरु वामनराव पै, जीवन संगीत आपला जो विषय आहे, अंधारातून प्रकाशाकडे त्याचा सरळ अर्थ आहे. तो म्हणजे अज्ञानातून

जैमिनीमुनी (पूर्वार्ध)

डॉ. अनुराधा कुलकर्णी, भारतीय ऋषी …anuradh.klkrn@gmil.com फार पूर्वी सर्व वेदमंत्र एकत्रच होते. त्या सहस्त्रावधी मंत्रात काहीत